Jagannath Rath Yatra 2025 pudhari photo
राष्ट्रीय

Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथ रथ यात्रेत पुरीचा राजा सोन्याच्या झाडूने रस्ता का झाडतो? जाणून घ्या हजारो वर्षांची अनोखी परंपरा

chhera pahara golden broom ritual : हिंदू धर्मात जगन्नाथ रथयात्रेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या यात्रेशी संबंधित अनेक अनोख्या प्रथा शतकानुशतके चालत आल्या आहेत.

मोहन कारंडे

Jagannath Rath Yatra 2025

पुरी : हिंदू धर्मात जगन्नाथ रथयात्रेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या यात्रेशी संबंधित अनेक अनोख्या प्रथा शतकानुशतके चालत आल्या आहेत, त्यापैकी सोन्याच्या झाडूने रस्ता साफ करणे ही एक खास प्रथा आहे. या विधीला ‘छेरा पहरा’ असे म्हटले जाते. पुरीच्या पूर्वीच्या राजघराण्याचे प्रमुख आणि जगन्नाथ मंदिराचे सध्याचे मुख्य सेवक असलेले गजपती महाराजा दिव्यसिंह देब रथयात्रेदरम्यान सोन्याच्या झाडून रस्ता झाडतात. जाणून घ्या काय आहे परंपरा.

दरवर्षी आषाढ शुक्ल द्वितीया तिथीला ओडिशातील पुरी येथे ही भव्य रथयात्रा काढली जाते. यावर्षी भगवान जगन्नाथाची रथयात्रा आज (दि. २७) पासून सुरू होत आहे. या यात्रेत भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा रथामध्ये स्वार होऊन नगर भ्रमंतीसाठी निघतात. यावेळी लाखो भाविक पुरी येथे येतात आणि रथ ओढण्याचे पुण्य कमवतात. अशी मान्यता आहे की, या यात्रेत सहभागी झाल्याने आणि रथ ओढल्याने जीवनातील सर्व पापे नष्ट होतात. भगवान जगन्नाथ आणि त्यांच्या भाऊ-बहिणींचे रथ ज्या मार्गावरून जातात, ते मार्ग सोन्याच्या झाडूने स्वच्छ केले जातात. असे करून भाविक भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्याप्रती कृतज्ञता आणि भक्ती व्यक्त करतात.

सोन्याच्या झाडूने साफसफाई का केली जाते?

पौराणिक कथेनुसार, सोने हा एक पवित्र धातू आहे, ज्याला देवी-देवतांच्या पूजेत विशेष स्थान आहे. यात्रा सुरू होण्यापूर्वी तिन्ही रथांचे मार्ग सोन्याच्या झाडूने स्वच्छ केले जातात आणि सोबत वैदिक मंत्रांचा जप केला जातो. हे केवळ आध्यात्मिक पावित्र्याचे प्रतीक नाही, तर देवाच्या स्वागतामध्ये कोणतीही कमतरता भासू नये, ही भावना देखील व्यक्त करते. ही परंपरा सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवते. या झाडूने फक्त राजांचे वंशजच रस्ता साफ करतात. सध्या राजघराण्याचे प्रमुख गजपती महाराजा दिव्यसिंह देब हे आहेत. धार्मिक मान्यतेनुसार, सोन्याच्या झाडूने रस्ता साफ करण्याचा उद्देश देवाचा मार्ग शुद्ध आणि पवित्र करणे हा आहे.

रथयात्रा का काढली जाते?

पौराणिक कथेनुसार, एकदा देवी सुभद्रेने पुरी नगर पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा भगवान जगन्नाथ आणि बलभद्र तिला रथात बसवून नगर भ्रमंतीसाठी निघाले आणि वाटेत आपली मावशी गुंडिचा देवीच्या मंदिरात काही दिवस थांबले. तेव्हापासून याच घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी रथयात्रा काढली जाते. तिन्ही रथ गुंडिचा मंदिरापर्यंत जातात आणि सात दिवस तिथेच विश्राम करतात. दरवर्षी आयोजित होणाऱ्या या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी दूरदूरवरून भाविक येतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT