पुढारी ऑनलाईन डेस्क
जगभरातील शेअर बाजारावर अमेरिकेतील संभाव्य मंदीच्या (recession in US) भितीचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास (RBI governor Shaktikanta Das) यांनी अमेरिकेतील मंदी संदर्भात भाष्य केले आहे. "अमेरिकेतील मंदीबद्दल आताच बोलणे अपरिपक्वता (premature) ठरेल. रिझर्व्ह बँकेच्या नजरेतून मी एवढेच म्हणेन की, आम्ही देशांतर्गत तसेच बाह्य स्त्रोतांकडून येणाऱ्या सर्व आकडेवारीवर लक्ष ठेवू. आम्ही सर्व उदयोन्मुख परिस्थितींना सामोरे जाऊ." असे दास यांनी म्हटले आहे.
आज भारताने देशाबाहेरील परिस्थितीचा सामना करण्याच्या क्षमतेत लक्षणीयरीत्या सुधारणा केली आहे. मला वाटते की भारतातील परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक लवचिक आहे आणि येणाऱ्या आकडेवारीची प्रतीक्षा करा," असे आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी नमूद केले आहे.
व्याजदरात कपात करण्याची घाई केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करता तो सलग नवव्यांदा ६.५ टक्के एवढा कायम ठेवला आहे. याबाबतचा निर्णय आज गुरुवारी (दि.८) आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास (RBI governor Shaktikanta Das) यांनी पतविषयक धोरण (RBI monetary policy) बैठकीनंतर जाहीर केला. गेल्या काही महिन्यांपासून किरकोळ महागाई उच्चांकी पातळीवर राहत असल्याने रेपो दरही आरबीआयने ६.५ टक्क्यांवर रोखून धरला आहे. रेपो दर हा व्याजदर आहे; ज्यावर आरबीआय इतर बँकांना कर्ज देते.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, "देशांतर्गत आर्थिक घडामोडी स्थिर आहेत. पुरवठ्याच्या विचार केला तर मान्सूनची स्थिर प्रगती, खरीप पिकांची अधिक पेरणी आणि जलसाठ्यात झालेली वाढ यामुळे खरीप उत्पादनवाढीसाठी पोषक वातावरण आहे. देशांतर्गत मागणीत सुधारणा झाल्याने उत्पादन उलाढालीला गती मिळत आहे."