ISRO space satellite Earth Pudhari
राष्ट्रीय

ISRO EOS-09: वादळ, धूर, अंधारातूनही भारतावर लक्ष ठेवणार 'इस्रो'चा सुपर स्मार्ट सॅटेलाईट; LOC पासून सागरी सीमेपर्यंत नजर

ISRO EOS-09: 18 मे रोजी प्रक्षेपण; पूर, चक्रीवादळ, दरड अशा संकटावेळी EOS-09 करेल भारताला सावधान; भारताची सुरक्षा आणखी मजबूत!

Akshay Nirmale

ISRO EOS-09 will keep an eye on India even through storms, smoke and darkness

नवी दिल्ली : ISRO चा नवीनतम पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-09 (RISAT-1B) हा भारताच्या उपग्रह तंत्रज्ञानातील एक मोठा टप्पा आहे. C-बँड Synthetic Aperture Radar (SAR) ने सुसज्ज असलेला हा सुपरस्मार्ट उपग्रह दिवस-रात्र, सर्व हवामानात कार्यक्षम असून, पूर, चक्रीवादळ ट्रॅकिंग, दरड कोसळण्याच्या घटना, सागरी सुरक्षा व लष्करी गुप्तचर यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

पारंपरिक ऑप्टिकल उपग्रहांसाठी अंधार, ढग किंवा धूर अडचणीचे ठरतात पण EOS-09 त्यातूनही अखंड प्रतिमा देतो. भारताच्या 15,000 किलोमीटर लांबीच्या सीमांचा आणि 7500 किमी सागरी किनाऱ्याचा विचार करता EOS-09 हा जणून भारताचा अंतराळातील पहारेकरीच आहे.

18 मे 2025 रोजी हा उपग्रह प्रक्षेपित होणार असून, पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर त्याचे महत्व मोठे आहे.

रियल टाईम वापरासाठी डिझाईन केलेला उपग्रह

ISRO च्या Earth Observation Satellite (EOS) उपग्रह मालिकेअंतर्गत नव्याने ब्रँड केलेला EOS-09 हा उपग्रह भारताच्या सर्व हवामानात, दिवसा आणि रात्रीच्या अंधारातही उच्च प्रतिमा (छायाचित्र) काढू शकेल अशी क्षमता असलेला आहे.

C-बँड सिंथेटिक अॅपर्चर रडार (SAR) ने सुसज्ज EOS-09 प्रत्यक्ष आणि रिअल-टाईम वापरासाठी डिझाइन करण्यात आला आहे. उदा.– पूर नकाशांकन, चक्रीवादळांचा मागोवा, दरड कोसळण्याचे भान, तसेच किनारी सुरक्षा यासाठी या उपग्रहाचा मोठा फायदा होणार आहे.

RISAT पासून EOS पर्यंतचा प्रवास

2008 मध्ये मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याने भारत हादरला आणि त्यानंतर इस्रोने तातडीने RISAT-2 उपग्रहाचे प्रक्षेपण केले. हा उपग्रह इस्रायलच्या TecSAR-1 वर आधारित होता. यामुळे भारताने रडार प्रतिमा उपग्रह (RISAT) मालिकेची सुरुवात केली.

RISAT मालिकेत दोन प्रकारचे SAR असतात:

X-बँड SAR: लष्करी गुप्तचर व टार्गेट ट्रॅकिंगसाठी उच्च-रिझोल्युशन प्रतिमा तयार करणारे (RISAT-2 व त्याचे उत्तराधिकारी).

C-बँड SAR: भूपृष्ठ, वनस्पती व जलस्रोत यांचे सर्व हवामानातील निरीक्षण करणारे (RISAT-1 मध्ये वापरले गेले).

EOS-09 चे वैशिष्ट्ये:

  • C-बँड SAR तंत्रज्ञान: ढग, धुके, पाऊस, धूर यांतूनही प्रतिमा मिळवते.

  • दिवस-रात्र सर्व हवामानातील प्रतिमांकन.

भूपृष्ठावरील अत्यंत सूक्ष्म हालचाली (जसे की वाहनांची हालचाल, मातीतील बदल) ओळखू शकतो – जे सुरक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत.

पाच इमेजिंग मोड्स:

  • High-Resolution Spotlight (1 मीटर पर्यंत रिझोल्यूशन)

  • Medium Resolution ScanSAR (225 किमी पर्यंत विस्तृत स्कॅन)

पोलरायझेशन तंत्रज्ञान: सह- व क्रॉस-पोलरायझेशन, तसेच हायब्रिड पोलरिमेट्री (अंदाज) वापरून भूपृष्ठ, वनस्पती, मानवनिर्मित संरचना (जसे की तंबू, लपवलेले कॅम्प) वर्गीकृत करू शकतो.

राष्ट्रीय सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापनात उपयोगी पडणार

सीमेवरील सुरक्षा

  • 15,000 किमी लांबीच्या जमिनीच्या सीमांवर (पाकिस्तानचा LOC, चीनची खडतर सीमा, बांगलादेशची झिरझिरीत सीमा) देखरेख.

  • संशयास्पद हालचाली, छुप्या हालचाली ओळखू शकतो.

सागरी सुरक्षा:

  • 7,500 किमी लांबीच्या किनारपट्टीवर बेकायदेशीर हालचालींचे निरीक्षण.

  • जहाजांची हालचाल, तेलगळती ट्रॅक करणे.

आपत्ती व्यवस्थापन:

  • वादळ, पूर, दरड यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये ढगांमधूनही रिअल-टाईम प्रतिमा.

  • मदत व बचाव कार्यासाठी तात्काळ माहिती पुरवतो.

का वेगळा आहे EOS-09?

पारंपरिक ऑप्टिकल उपग्रह जिथे अंधार, ढग, वादळांमध्ये अपयशी ठरतात, तिथे EOS-09 सतत कार्यरत राहतो. युद्धस्थिती असो वा नैसर्गिक आपत्ती – हा उपग्रह खरा “स्मार्ट, अष्टपैलू आणि सर्वकाळ तयार असलेला भारताचा जणू डोळा” असणार आहे.

एकंदरीत EOS-09 हा केवळ एक उपग्रह नसून, भारतातील गुप्तचर आणि आपत्ती निवारण क्षमतेतील क्रांतिकारक पाऊल आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT