‘आयएसआय‌’पुरस्कृत शस्त्रपुरवठा नेटवर्कचा पर्दाफाश 
राष्ट्रीय

Arms smuggling : ‘आयएसआय‌’पुरस्कृत शस्त्रपुरवठा नेटवर्कचा पर्दाफाश

चौघे अटकेत, 10 अत्याधुनिक पिस्तुले जप्त; दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्ली पोलिस गुन्हे शाखेने शनिवारी एका मोठ्या कारवाईत ‌‘आयएसआय‌’पुरस्कृत आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र पुरवणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आणि याप्रकरणी चार तस्करांना अटक केली. या नेटवर्कचा उद्देश दिल्ली-एनसीआरमधील टोळ्यांना तुर्किये आणि चीनमध्ये बनवलेल्या अत्याधुनिक पिस्तूलचा पुरवठा करणे हा होता. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून 10 अत्याधुनिक पिस्तुले आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त केली आहेत.

ड्रोनद्वारे पाकिस्तानातून शस्त्रांची तस्करी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेली शस्त्रे ड्रोनच्या साहाय्याने पाकिस्तानातून भारतात, विशेषतः पंजाबमध्ये आणली जात होती. त्यानंतर पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील तस्कर ही शस्त्रे दिल्ली आणि आसपासच्या राज्यांतील गुन्हेगारी सिंडिकेटस्‌‍ना पोहोचवत होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मनदीप, अजय, दलविंदर आणि रोहन अशी असून, ते पंजाब आणि उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत.

आंतरराष्ट्रीय नेटवर्क

हे आरोपी लॉरेन्स बिष्णोई, गोगी, बंबीहा आणि हिमांशू भाऊ यांच्यासारख्या प्रमुख गुंडांच्या टोळ्यांना शस्त्रे पुरवणाऱ्या मॉड्यूलचा भाग होते. या शस्त्रांचा दर्जा आणि पुरवठ्याची व्याप्ती पाहता हे सुव्यवस्थित, आंतरराष्ट्रीय नेटवर्क असल्याचे स्पष्ट होते.

परदेशी सूत्रधाराचा शोध सुरू

एका विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारावर गुन्हे शाखेने रोहिणी परिसरात सापळा रचला आणि पुरवठ्यासाठी आलेल्या आरोपींना अटक केली. सध्या, तपासकर्ते या नेटवर्कद्वारे भारतात किती शस्त्रांचे साठे आले आणि कोणत्या गुन्हेगारी गटांना ते मिळाले, याची तपासणी करत आहेत. या संपूर्ण साखळीतील परदेशी सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी मोबाईल लोकेशन्स, बँक व्यवहार आणि सोशल मीडिया गतिविधींचे विश्लेषण केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT