Food Safety Rules
तुम्ही रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार करत असाल ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्हाला रेस्टॉरंट सुरु करण्यापूर्वी, मेन्यूमध्ये शाकाहारी की मांसाहारी जेवण आहे, हे स्पष्ट सांगावे लागणार आहे. त्यासाठी नवीन नियमांची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा नियामक मंडळाच्या एका वरिष्ठ पॅनेलच्या माहितीनुसार, रेस्टॉरंट्सनी नोंदणी अथवा परवान्याचे नूतनीकरण करताना त्यांच्याकडील मेन्यूच्या प्रकाराची माहिती द्यायला हवी. मांसाहारी जेवणाची सोय असलेल्या रेस्टॉरंट्समध्ये गोमांस अथवा डुकराचे मांस विकले जात आहे का? हे स्पष्ट करायला हवे. याबाबतचे वृत्त mint ने दिले आहे.
सांस्कृतिक आहार पद्धतींचा आदर करणे आणि ग्राहकांना ते ज्या रेस्टॉरंटमधून खाद्यपदार्थ खरेदी करत आहेत अथवा तिथे जाऊन खात आहेत त्यांना त्याबाबत स्पष्ट माहिती असणे, हा यामागील उद्देश आहे, असे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. अन्न सुरक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या सूचनेनंतर याबाबतचा प्रस्ताव हाती घेण्यात आला, असेही सांगण्यात आले आहे.
सध्या सुरु असलेल्या रेस्टॉरंट्सना भविष्यात ही माहिती द्यावी लागेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. जर एखाद्या शाकाहारी रेस्टॉरंटला मांसाहारी मेन्यू सुरु करायचा असेल तर त्यांना पहिल्यांदा परवाना घेण्यासाठी अर्ज करावा लागेल.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच FSSAI च्या केंद्रीय सल्लागार समितीने (CAC) भुवनेश्वर येथे नुकत्याच झालेल्या त्यांच्या बैठकीत या बदलासंदर्भात शिफारस केली आहे. शाकाहारी आणि मांसाहारी रेस्टॉरंट्स ओळखण्याबाबतच्या या नवीन धोरणाचा उद्देश पारदर्शकता राखणे आणि सांस्कृतिक अनुपालन सुनिश्चित करण्याचा आहे, असे सांगत या समितीने देशभरातील विविध आहार पद्धतीकडे लक्ष वेधून घेतले आहे.
"अन्न सुरक्षा आणि ग्राहक सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी FSSAI वचनबद्ध आहे. रेस्टॉरंटच्या परवाना आणि नोंदणी अर्जांवर त्यांच्याकडील अन्नाचा प्रकार स्पष्टपणे नमूद करून, व्यवसाय हे ग्राहकांना त्यांच्या वैयक्तिक श्रद्धा आणि आवडींनुसार पर्याय निवडण्यासाठी आवश्यक असलेली माहिती पुरवतील," असे दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
येत्या काही महिन्यांत या नवीन धोरणाची अंमलबजावणी केली जाणार असून त्याची जबाबदारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांवर असणार आहे. मांस, मासे, दूध आणि अंडी यांसारखे पदार्थ मिळणाऱ्या रेस्टॉरंट्सची तपासणी राज्यस्तरीय अन्न सुरक्षा अधिकारी (FSO) प्राधान्याने करतील, अशी तरतूद एफएसएसएआय (FSSAI) ने केली आहे.
प्रत्येक अन्न सुरक्षा अधिकारी महिन्याला १० खाद्यपदार्थ व्यवसायांची तपासणी करेल; विशेषतः उच्च जोखीम असलेल्या व्यवसायांची प्राधान्याने तपासणी करावी लागणार आहे," असे अधिकाऱ्याने सांगितले. मांस आणि अंडी यासारख्या वस्तू लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्या योग्यरित्या हाताळल्या नाही तर अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो.
भारतातील अन्न प्रक्रिया उद्योग वेगाने वाढत आहे. हा उद्योगाची उलाढाल २०३० पर्यंत ७०० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मांसाहारी अन्न हा एक प्रमुख त्यातील घटक आहे. केवळ मांस उद्योग बाजाराची उलाढाल २०२४ मधील ५५.३ अब्ज डॉलरवरून २०३३ पर्यंत ११४.४ अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
व्हेगन फूडमध्येही वेगाने वाढ होत आहे. त्याचे मूल्य २०२४ मधील १.४२ अब्ज डॉलरवरून २०३२ पर्यंत २.९६ अब्ज डॉलरपर्यंत दुपटीने वाढण्याची शक्यता आहे.