India Independence Day 2026:
नवी दिल्ली: भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जगातील प्रमुख देशांच्या प्रमुखांनी भारताला आणि देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष संदेश पाठवून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारत आणि इराणमधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध हा दोन्ही देशांमधील उज्ज्वल भविष्यासाठी एक 'अमूल्य ठेवा' असल्याचे सांगत त्यांनी द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्याची इराणची तयारी दर्शवली आहे.
इराणच्या अध्यक्षीय कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, पेझेश्कियान यांनी उभय देशांमधील परस्पर विश्वास आणि आदराच्या भावनेवर भर दिला. दोन्ही देशांमधील ऊर्जा, व्यापार आणि पायाभूत सुविधांमधील क्षमतांचा पूर्ण वापर करून संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठी इराण कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भारताच्या निरंतर प्रगती आणि समृद्धीसाठी त्यांनी प्रार्थना केली.
इराणव्यतिरिक्त जगातील इतर प्रमुख राष्ट्रप्रमुखांनीही भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत:
रशिया: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या संदेशात भारताच्या आर्थिक, वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षेत्रातील प्रगतीचे कौतुक केले. आंतरराष्ट्रीय पटलावर भारताची प्रतिष्ठा सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
ऑस्ट्रेलिआ: ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील संघर्षाची आठवण काढत, स्वातंत्र्यदिनाला आशेची आणि नव्या सुरुवातीची पर्वणी म्हटले.
फ्रांस व मालदीव: फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारतीय नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या, तर मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी भारतासोबतची दीर्घकालीन मैत्री आणि सहकार्य अधिक दृढ करण्याचा पुनरुच्चार केला.