IndiGo Turkey Planes
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून विमानांच्या फेऱ्या रद्द झाल्यामुळे चर्चेत असलेल्या 'इंडिगो' एअरलाइनला नागरी विमानन महासंचालनालयाने (DGCA) मोठा दणका दिला आहे. सोमवारी इंडिगोने तुर्कीकडून घेतलेल्या विमानांच्या भाडेतत्त्व कालावधीबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
तुर्कीच्या विमान कंपन्यांकडून भाड्याने घेतलेली विमाने उडवण्यासाठी इंडिगोला केवळ मार्च २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली असून, त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे DGCA ने स्पष्ट केले आहे.
तुर्कीच्या 'कोरेन्डन एअरलाइन्स'कडून इंडिगोने ५ बोईंग ७३७ विमाने भाडेतत्त्वावर घेतली आहेत. या विमानांच्या संचलनासाठी मार्च २०२६ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. यामध्ये 'सनसेट क्लॉज'चा समावेश असून यापुढे कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही. इंडिगोची लांब पल्ल्याची विमाने फेब्रुवारी २०२६ पर्यंत ताफ्यात दाखल होणार असल्याने त्यांनी ही वेळ मागितली होती.
इंडिगो सध्या एकूण १५ परदेशी विमाने 'वेट लीज' तत्त्वावर चालवत आहे, ज्यामध्ये तुर्कीच्या ७ विमानांचा समावेश आहे. या वर्षी ऑगस्ट २०२५ मध्ये, DGCA ने इंडिगोला टर्किश एअरलाइन्सकडून घेतलेली दोन बोईंग ७७७ विमाने चालवण्यासाठी काही अटींसह फेब्रुवारी २०२६ पर्यंत सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती. विशेष म्हणजे, तुर्कीने पाकिस्तानची पाठराखण केल्यामुळे आणि भारताने दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यांचा निषेध केल्यामुळे ही कठोर भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.
केवळ इंडिगोच नाही, तर स्पाइसजेट सारख्या एअरलाइन्सची १७ परदेशी विमाने भारतात कार्यरत आहेत. DGCA अधिकाऱ्याच्या मते, जागतिक विमान वाहतूक क्षेत्रात विमानांचे वेट लीजिंग ही एक सामान्य प्रक्रिया आहे. इंजिनमधील समस्यांमुळे विमाने जमिनीवर उभी असणे आणि नवीन विमानांच्या डिलिव्हरीला होणारा विलंब यामुळे भारतीय एअरलाइन्स प्रवाशांच्या सोयीसाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून परदेशी कंपन्यांकडून विमाने भाड्याने घेत आहेत.