Indigo Flight Cancellation Crisis: देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगो गेल्या काही दिवसांपासून गंभीर संकटाचा सामना करत आहे. एकट्या इंडिगोने 1,000 पेक्षा जास्त फ्लाइट्स रद्द केल्याने मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, हैदराबादसह देशभरातील एअरपोर्ट्सवर गोंधळ झाला आहे. प्रवासी तासन्तास अडकून राहिले असून एअरपोर्ट्सची अवस्था अक्षरशः रेल्वे स्टेशनसारखी झाली आहे.
फ्लाइट लेट होणे व तांत्रिक बिघाड या समस्या आधीपासूनच होत्या. सुरुवातीला एअरलाइनने यासाठी तांत्रिक त्रुटी, हिवाळ्यातील नवे शेड्युल, एअरपोर्टवरील गर्दी आणि खराब हवामान जबाबदार असल्याचे सांगितले. पण खरी अडचण तेव्हा निर्माण झाली, जेव्हा भारत सरकारने Flight Duty Time Limitation (FDTL) चे नवे नियम लागू केले.
नव्या नियमांनुसार पायलट्सना अधिक विश्रांती देणे बंधनकारक करण्यात आले, त्यामुळे इंडिगोकडील आधीच कमी असलेला स्टाफ आणखी कमी झाला आहे. आता पायलट्स नसल्याने अनेक फ्लाइट्स रद्द कराव्या लागल्या आहेत.
इंडिगो दररोज सर्वाधिक उड्डाणे करते; त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने फ्लाइट्स रद्द झाल्यावर एअरपोर्ट्सवर प्रचंड गोंधळ निर्माण झाला. सरकारने काही नियमांमध्ये सवलत दिली असली, तरी परिस्थिती अजूनही पूर्णपणे नियंत्रणात नाही. डीजीसीएने नुकताच एक नियम मागे घेतला आहे तो म्हणजे, पायलट्सची विश्रांती आता ‘ऑफ डे’मध्ये बदलता येणार नाही.
यामुळे पायलट रोटेशन थोडेसे सोपे होईल.
पायलट संघांचे गंभीर आरोप:
इंडिगोला नवे नियम लागू होणार हे आधीपासून माहीत होतं.
तरीही कंपनीने स्टाफची भरती केली नाही.
उलट आधीपासूनच कमी लोकांवर अधिक कामाचा ताण वाढवला.
त्यामुळे संकट आणखी गंभीर झालं.
काही तज्ञांचे मत आहे की इंडिगोने मुद्दाम संकट वाढवून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून नियम शिथिल करता येतील.
देशभरातील विमानतळावर हजारो प्रवासी अडकलेले आहेत, तिकीटांचे दर वाढलेले आहेत आणि एअरपोर्ट्सवर मोठी गर्दी झाली आहे. सरकारचे म्हणणे आहे की 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत परिस्थिती पूर्ववत होऊ शकते.