प्रतीकात्मक छायाचित्र. file photo.
राष्ट्रीय

IndiGo flight incident | विमानात मध्यरात्री थरार! प्रवाशाकडून 'इमर्जन्सी डोअर' उघडण्याचा प्रयत्न! कारण ऐकून पोलिसही चक्रावले

IndiGo flight incident | कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला, घटनेचा सखोल तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

IndiGo flight incident

वाराणसी : इंडिगोच्या एका विमानात शनिवारी एक विचित्र आणि भीतीदायक घटना घडली. विमान उतरण्याच्या काही मिनिटे आधीच एका प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा (emergency exit door) उघडण्याचा प्रयत्न केला; त्यानंतर, "माझ्यावर भुताचा ताबा होता," असा अजब दावा त्याने केला.

प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर आपत्कालीन दरवाजाशी छेडछाड

बंगळुरू ते वाराणसी अशी सेवा देणारे इंडिगोचे विमान क्रमांक 6E-185 रात्री ८:१५ च्या सुमारास बंगळुरू येथून रवाना झाले. या विमानात प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्याचा रहिवासी मोहम्मद अदनान याचा समावेश होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासाला सुरुवात होऊन अवघी १५ मिनिटेच झाली असताना, अदनानने आपत्कालीन दरवाजाशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. विमानातील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली; तेव्हा अदनानने ती एक चूक असल्याचे सांगितले. कर्मचाऱ्यांनी त्याला पुन्हा अशी कृती न करण्याबाबत ताकीद दिली.

विमान उतरण्यापूर्वी पुन्हा तोच प्रकार

रात्री १०:२० वाजेपर्यंत वाराणसीच्या 'लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर' विमान उतरण्याच्या अगदी काही क्षण आधीपर्यंत, अदनानचे वर्तन पूर्णपणे सामान्य होते. विमान अजूनही ५०० फूट उंचीवर असताना, अदनानने पुन्हा एकदा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.

... अखेर विमान सुखरूप जमिनीवर उतरले

अधिकाऱ्यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांनी तत्परतेने सावध केल्यानंतर, वैमानिकाने प्रसंगावधान राखले आणि विमानाचे लँडिंग करण्याचा तो प्रयत्न तात्पुरता थांबवला. त्यानंतर विमानाने पुन्हा हवेत फेरफटका घेतला आणि रात्री १०:३५ वाजता विमान सुखरूप जमिनीवर उतरले.

विमानातील इतर प्रवाशांमध्ये प्रचंड दहशत

अधिकाऱ्यांनी सांगितले की, अदनानच्या या कृत्यामुळे विमानातील इतर प्रवासी हादरून गेले होते; सुरक्षित लँडिंग केल्याबद्दल त्यांनी विमान कर्मचाऱ्यांचे आभार मानले. विमानन नियमावलीनुसार (protocol), अदनानला तात्काळ विमान कंपनीचे सुरक्षा कर्मचारी आणि 'सीआयएसएफ'च्या (CISF - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) ताब्यात देण्यात आले. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

म्हणे, माझ्यावर भुताचा ताबा होता

विमानतळावर सुरक्षा कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, सुरुवातीला अदनानने आपण तसे वर्तन का केले, हे आपल्यालाच समजत नसल्याचे सांगितले. मात्र, नंतर त्याने "माझ्यावर भुताचा ताबा होता," असा अजब दावा केला. पोलीस ठाण्यात सखोल चौकशी केली असता, त्याने सांगितले की तो गोव्यातील सुट्टीवरून परतत होता आणि आपण ज्या कडीला ओढत आहोत, ती आपत्कालीन दरवाजा उघडणारी कडी आहे, याची त्याला कल्पना नव्हती. "आमचा तपास सुरू आहे आणि आरोपीची चौकशी अजूनही सुरूच आहे. मऊ येथे राहणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली असून, ते वाराणसीच्या दिशेने निघाले आहेत," असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT