राष्ट्रीय

IndiGo Flight Hijack Threat : "विमान ६:३० वाजता हायजॅक केले जाईल"; एक चिठ्ठी सापडली अन् इंडिगोच्या विमानात उडाला थरार

सुरक्षा नियमांनुसार विमान पुन्हा केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर परतले

पुढारी वृत्तसेवा

IndiGo Flight Hijack Threat : बंगळुरूहून लखनौला जाणारे इंडिगो विमान शनिवारी (दि. ७ नोव्‍हेंबर) उड्डाण केल्यानंतर काही वेळातच पुन्हा केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर परतले. विमानातील प्रसाधनगृहात (वॉशरूम) विमान हायजॅक करण्याची धमकी देणारी चिठ्ठी सापडल्याने खळबळ उडाली. विशेष म्‍हणजे दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या ६ई ६०९१ (6E 6091) या विमानाला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) उड्डाणापूर्वी बॉम्बची धमकी मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा प्रकार घडला आहे.

"हे विमान बरोबर ६:३० वाजता हायजॅक केले जाईल"

'६ई ४५१' (6E 451) क्रमांकाचे हे विमान १७८ प्रवाशांना घेऊन ७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५:५० वाजता बंगळुरूहून रवाना झाले होते. प्रसाधनगृहात "हे विमान बरोबर ६:३० वाजता हायजॅक केले जाईल," अशी धमकी असणारी चिठ्ठी सापडली अन् इंडिगोच्या विमानात उडाला थरार उडला.

सुरक्षा नियमांनुसार विमान पुन्हा बंगळूरला परतले

धमकीची चिठ्ठी सापडल्यानंतर कर्मचारी वर्गाने संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली. वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) सतर्क केले आणि सुरक्षा नियमांनुसार विमान पुन्हा बंगळुरूला परत आणण्याचा निर्णय घेतला. . पुढील प्रवासापूर्वी आवश्यक सुरक्षा तपासणी करण्यासाठी विमान पुन्हा मूळ विमानतळावर परतले.

प्रवासी, कर्मचार्‍यांची सुरक्षेला सर्वोच्‍च प्राधान्‍य

शनिवारी जारी केलेल्या एका निवेदनात इंडिगोने स्पष्ट केले की, बंगळुरूहून लखनौला जाणाऱ्या '६ई ४५१' या विमानात सुरक्षेशी संबंधित धमकी मिळाली होती. मानक कार्यपद्धतीनुसार (SOP), संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित सूचित करण्यात आले. सुरक्षेच्या प्रोटोकॉलचे पालन करत, आवश्यक तपासणी करण्यासाठी वैमानिकांनी विमान पुन्हा मूळ विमानतळावर परत आणण्याचा निर्णय घेतला. इंडिगोसाठी आमचे प्रवासी, कर्मचारी आणि विमानाची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे." दोन दिवसांत इंडिगोच्या दुसऱ्या विमानाला सुरक्षेच्या धोक्याचा सामना करावा लागला.

प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीने व्यक्त केली दिलगिरी

प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल विमान कंपनीने दिलगिरी व्यक्त केली असून, त्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. प्रवाशांना अल्पोपहार देण्यात आला असून, परिस्थितीबद्दल आणि पुढील कार्यवाहीबद्दल त्यांना वेळोवेळी माहिती दिली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT