राष्ट्रीय

IndiGo Flight Diverted : हवेत असतानाच पॉवर बँकने घेतला पेट; इंडिगोच्या दिल्ली-चेन्नई विमानाचे हैदराबाद येथे आपत्कालीन लँडिंग

Delhi Chennai Flight Fire : केबिन क्रूच्या तत्परतेमुळे टळला मोठा अनर्थ; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, पर्यायी विमानाची सोय

पुढारी वृत्तसेवा

हैदराबाद : दिल्लीहून चेन्नईच्या दिशेने झेपावलेल्या ‘इंडिगो’ एअरलाइन्सच्या एका विमानामध्ये रविवारी (दि.११) प्रवाशाच्या वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक उपकरणातून अचानक धूर निघू लागल्याने एकच खळबळ उडाली. या आणीबाणीच्या प्रसंगानंतर वैमानिकाने सुरक्षेचा उपाय म्हणून हे विमान तातडीने हैदराबादच्या दिशेने वळवले. विमानातील कर्मचारी वर्गाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने परिस्थिती नियंत्रणात आणली गेली आणि विमानाचे हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दिल्ली-चेन्नई मार्गावर उड्डाण करत असलेल्या 6E 6115 या विमानामध्ये प्रवाशाच्या बॅगेतून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे विमानातील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक अंदाजानुसार, प्रवाशाच्या पॉवर बँकेने पेट घेतल्यामुळे हा धूर पसरल्याचे मानले जात आहे. मात्र, इंडिगोने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनात हे उपकरण ‘पॉवर बँक’च होती की अन्य काही, याचा स्पष्ट उल्लेख टाळत केवळ ‘वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक उपकरणातून धूर आला’ असा उल्लेख केला आहे.

घटनेची माहिती मिळताच विमानातील केबिन क्रूने अत्यंत तत्परतेने पावले उचलली आणि आग विझवण्याचे विविध प्रयत्न करत परिस्थिती आटोक्यात आणली. दरम्यान, विमान वाहतुकीच्या सुरक्षा नियमावलीनुसार वैमानिकांनी तात्काळ हैदराबादच्या शमशाबाद विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. विमानातील एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, विमानातील कप्प्यात अचानक धूर आणि आगीची ठिणगी दिसल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. हा संपूर्ण अनुभव अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारा होता; मात्र कर्मचाऱ्यांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला.

प्रवाशांच्या प्रवासासाठी पर्यायी विमानाची सोय

या अनपेक्षित घटनेमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. इंडिगोच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांना चेन्नईला सुखरूप पोहोचवण्यासाठी कंपनीने तातडीने दुसऱ्या पर्यायी विमानाची व्यवस्था केली. तसेच प्रवाशांना अल्पोपहार आणि वेळोवेळी प्रवासाचे अपडेट्स देऊन त्यांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे एअरलाइन्सने स्पष्ट केले. प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा हीच आपली सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे कंपनीने पुन्हा एकदा अधोरेखित करत या त्रासाबद्दल प्रवाशांची दिलगिरी व्यक्त केली.

विमानात एकूण किती प्रवासी प्रवास करत होते आणि या घटनेत कोणाला दुखापत झाली आहे का, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. तसेच हे उपकरण नेमके कोणत्या कारणाने पेटले आणि प्रवाशांचा पुढील प्रवास नेमका कधी सुरू होईल, याबाबतची सविस्तर माहिती मिळणे अद्याप बाकी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT