IndiGo airlines caste discrimination trainee pilot harassment SC/ST atrocity casteism at workplace India FIR
नवी दिल्ली : भारतातील आघाडीची विमान कंपनी इंडिगोमध्ये प्रशिक्षणार्थी पायलटला जातीय भेदभावाची आणि अपमानास्पद वागणूक दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी अनुसूचित जाती प्रवर्गातील 35 वर्षीय प्रशिक्षणार्थी पायलटने इंडिगोच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
यानुसार, तपस डे, मनिष साहनी आणि कॅप्टन राहुल पाटील यांच्यावर SC/ST अत्याचार प्रतिबंध अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रशिक्षणार्थी पायलटने दिलेल्या तक्रारीनुसार, 28 एप्रिलला गुरुग्राम येथील इंडिगो कार्यालयात एका बैठकीत हा प्रकार घडला. यावेळी त्याला "तू विमान उडवायला पात्र नाहीस, परत जा आणि बूट शिव" असे वक्तव्य एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केले. तु येथे सुरक्षा रक्षक होण्यासाठीसुद्धा लायक नाहीस" असेही त्याला म्हटले गेले.
या घटनेनंतर प्रशिक्षणार्थी पायलटने इंडिगोवर आपल्यावर जातीय भेदभाव व अपमानकारक वागणुकीचा आरोप केला आहे. त्याने सांगितले की, त्याला केवळ अपमानितच केले नाही तर व्यावसायिक त्रासही दिला गेला. पगार कमी करणे, जबरदस्तीने पुनःप्रशिक्षण घेण्यास लावणे आणि विविध अनुचित इशारे देणे असे प्रकार घडले.
त्याने या सर्व प्रकाराबाबत इंडिगोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तसेच कंपनीच्या नीतिमत्ता समितीशीही संपर्क साधला, मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. अखेर वैतागून त्याने शेवटी पोलिसांकडे धाव घेतली.
हा प्रकार प्रथम बंगळुरू पोलिसांपर्यंत पोहोचला. तिथल्या पोलिसांनी "झिरो FIR" नोंदवली. म्हणजे गुन्हा कुठल्या पोलिस ठाण्यातही नोंदवला जाऊ शकतो. नंतर ही FIR इंडिगोच्या मुख्यालय असलेल्या गुरुग्राम पोलिसांकडे पाठवण्यात आली.
या आरोपांबाबत इंडिगोने सर्व आरोप नाकारले आहेत. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या विधानानुसार, "इंडिगो कोणत्याही प्रकारचा भेदभाव, छळ किंवा पक्षपाताबाबत झीरो टॉलरन्स भूमिका घेते. आणि कंपनीला एक समावेशक व आदरयुक्त कार्यस्थळ बनवण्यासाठी कटिबद्ध आहे.
या बिनबुडाच्या आरोपांना आम्ही ठामपणे नाकारतो आणि न्यायालयीन चौकशीला संपूर्ण सहकार्य करू, असेही इंडिगोने म्हटले आहे.