दिल्लीहून लेहला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात (6E 2006) तांत्रिक बिघाड झाल्याची घटना आज (दि. १९) घडली. लेहजवळ येताच विमान मागे वळले आणि दिल्लीत सुरक्षितपणे उतरले. दरम्यान, ग्राहकांना लेहला पोहोचवण्यासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आल्याचे इंडिगो एअरलाइनने स्पष्ट केले आहे.
या घटनेबाबत माहती देताना इंडिगो एअरलाइनने म्हटलं आहे की, "इंडिगोचे विमान दिल्लीहून लेहला निघाले. विमानात क्रू मेंबर्ससह सुमारे १८० प्रवासी होते. लेहजवळ येताच तांत्रिक बिघाड झाला. यामुळे विमान चाकुलाहून पुन्हा मागे वळाले आणि दिल्ली विमानतळवर सुरक्षितपणे उतरले. विमान पुन्हा सुरू करण्यापूर्वी त्याची आवश्यक देखभाल केली जात आहे. दरम्यान, ग्राहकांना लेहला पोहोचवण्यासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे."
हैदराबादहून तिरुपतीला जाणाऱ्या स्पाइसजेट एसजी २६९६ विमानात तांत्रिक बिघाड झाला. विमान सकाळी ६:१० वाजता उड्डाण करणार होते, परंतु ते सकाळी ६:१९ वाजता उड्डाण केले. त्यानंतर, विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची तक्रार आली. पीआरओ जीएमआर यांनी सांगितले की, विमान हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर परत आणण्यात आले आणि सुरक्षितपणे उतरवण्यात आले.
कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला मंगळवारी, १७ जून रोजी नागपूरमध्ये इमर्जन्सी (आपत्कालीन) लँडिंग करावे लागले होते. विमानात बॉम्बची धमकी देण्यात आली होती. सकाळी ९:३१ वाजता कोचीहून उड्डाण केल्यानंतर लगेचच एअरलाइनच्या अधिकृत आयडीवर ईमेलद्वारे ही धमकी मिळाली. विमान मूळतः मस्कतहून कोची येथे पोहोचले होते आणि १५७ प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्ससह दिल्लीला जात होते. धमकीनंतर, कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (CIAL) ने परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी बॉम्ब धमकी मूल्यांकन समिती (BTAC) ची बैठक बोलावली. अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देण्यात आल्या आणि खबरदारीचा उपाय म्हणून विमान नागपूरला वळवण्यात आले होते. फ्रँकफर्टहून हैदराबादला जाणाऱ्या लुफ्थांसा फ्लाईट LH752 ला बॉम्बची धमकी देण्यात आल्याच्या एक दिवसानंतरच ही घटना घडली होतो. लागोपाठ येणाऱ्या धमक्यांमुळे विमान वाहतुकीच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे, ज्यामुळे विमानतळांवर दक्षता वाढविण्यात आली आहे.