राष्ट्रीय

Indian student death |वेदनादायी..! IIT मद्रासमधून केमिकल इंजिनीअरिंग पूर्ण केलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा अमेरिकेत मृत्यू

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्‍ये घेत होता पदव्युत्तर शिक्षण

पुढारी वृत्तसेवा

Indian student found dead US

सॅन फ्रान्सिस्को : गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या साकेत श्रीनिवासैया या २२ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा अमेरिकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. साकेत हा युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले येथे पदव्युत्तर शिक्षण घेत होता. सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावासाने रविवारी या वृत्ताला दुजोरा दिला.

कोण होता साकेत?

साकेत हा मूळचा कर्नाटक येथील रहिवासी होता. आयआयटी मद्रास (IIT Madras) मधून २०२५ मध्ये केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक पूर्ण केले होते.सध्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले येथे 'केमिकल अँड बायोमॉलिक्युलर इंजिनीअरिंग'मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत होता.

९ फेब्रुवारीपासून होता बेपत्ता

साकेत श्रीनिवासैया ९ फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तो शेवटचा बर्कले हिल्स परिसरातील 'लेक अंझा' जवळ दिसला होता. विशेष म्हणजे, त्याचा पासपोर्ट आणि लॅपटॉप असलेली बॅग परिसरातील एका घराच्या पायऱ्यांवर आढळून आली होती. त्‍यामुळे घातपाताची शक्यता किंवा गूढ वाढले होते.

मित्र आणि सरकारने केले होते आवाहन

साकेत बेपत्ता झाल्यानंतर त्याचा रूममेट बनीत सिंग याने सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले होते. साकेतचा शोध घेण्यासाठी तो स्थानिक पोलिसांच्या संपर्कात होता. कर्नाटकच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनीही परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहून या प्रकरणात राजनैतिक हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. मात्र, दुर्दैवाने साकेतचा मृतदेह हाती लागल्याने त्‍याच्‍या कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्‍का बसला आहे.

भारतीय दूतावासाने व्‍यक्‍त केला शोक

भारतीय दूतावासाने 'X' वरील पोस्टमध्‍ये म्‍हटलं आहे की, "स्थानिक पोलिसांनी बेपत्ता भारतीय विद्यार्थी साकेत श्रीनिवासैया याचा मृतदेह सापडल्याची पुष्टी केली आहे, हे कळवताना आम्हाला अत्यंत दुःख होत आहे. या कठीण प्रसंगी आम्ही साकेतच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.पार्थिव भारतात आणण्यासाठी आणि इतर आवश्यक कायदेशीर बाबींसाठी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधला जात असून, कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली जात आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT