Indian Navy Sailor Arrested Honeytrap : सोशल मीडियावरून ओळख झालेल्या एका पाकिस्तानी महिला हेराच्या जाळ्यात अडकून भारतीय नौदलाची संवेदनशील आणि गुप्त माहिती शत्रूच्या हाती सोपवणाऱ्या जवानाला आंध्र प्रदेशच्या 'काउंटर इंटेलिजन्स' (सीआय) पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. ३१ वर्षीय प्रदीप मुखर्जी असे या जवानाचे नाव असून, ३ ऑक्टोबर रोजी कोइम्बतूर येथील नौदलाच्या 'आयएनएस अग्रणी' या प्रशिक्षण केंद्रातून त्याला ताब्यात घेण्यात आले.
मूळचा पश्चिम बंगालचा असलेला प्रदीप मुखर्जी २०१४ मध्ये भारतीय नौदलात नाविक (नाविक/सेलर) म्हणून भरती झाला होता. सध्या तो विशाखापट्टणम येथील पूर्व नौदल कमांडमध्ये तैनात होता. गेल्या एका आठवड्यापासून तो कोइम्बतूर येथील 'आयएनएस अग्रणी' या लीडरशिप ट्रेनिंग सेंटरमध्ये एका व्यवस्थापन विकास अभ्यासक्रमासाठी (मॅनेजमेंट डेव्हलपमेंट कोर्स) आला होता. याच दरम्यान काउंटर इंटेलिजन्सच्या गुप्त बातमीदारांनी चक्रे हलवून त्याला थेट प्रशिक्षण केंद्रातूनच अटक केली.
तपासात मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी एका पाकिस्तानी महिला हेराने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदीपशी संपर्क साधला होता. हळूहळू या संपर्काचे रूपांतर मैत्रीत झाले. 'हनीट्रॅप'चा वापर करून या महिलेने प्रदीपला आपल्या जाळ्यात ओढले. या मायाजालात अडकलेल्या प्रदीपने विशाखापट्टणम येथील नौदल तळाशी संबंधित अत्यंत संवेदनशील माहिती, युद्धनौका आणि ताफ्यांची (फ्लीट) हालचाल तसेच नौदलाच्या मोहिमांची गुप्त माहिती ऑनलाइन माध्यमातून या महिला हेराला पुरवल्याचे उघडकीस आले आहे.
आंध्र प्रदेश पोलिसांच्या सीआय सेलकडून सध्या प्रदीप मुखर्जीची कसून चौकशी सुरू असून, त्याने आतापर्यंत आणखी कोणकोणती माहिती शत्रू देशाकडे सुपूर्द केली आहे आणि या प्रकरणात नौदलातील इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.