Project Cheetah Success
नवी दिल्ली : भारताच्या चित्ता पुनरुत्पादन प्रकल्पाला (Project Cheetah) मोठे यश मिळाले आहे. भारतीय भूमीवर जन्मलेल्या मादी चित्ता 'मुखी'ने (वय अंदाजे ३३ महिने) हिने पाच बछड्यांना जन्म दिला आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी 'एक्स' पोस्टच्या माध्यमान दिली आहे.
या प्रकल्पासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक उपलब्धी आहे. आधुनिक काळात भारतीय भूमीवर जन्म झालेल्या चित्त्याने प्रजनन करण्याची ही पहिलीच वेळ आहे, ज्यामुळे 'प्रोजेक्ट चित्ता' (Project Cheetah) च्या वाटचालीस लक्षणीय यश मिळाले आहे. भारतीय-वंशाच्या चित्त्याचे यशस्वी पुनरुत्पादन हे भारतीय अधिवासांमध्ये या प्रजातीच्या अनुकूल, आरोग्य आणि दीर्घकालीन संभाव्यतेचा एक मजबूत संकेत आहे, असेही वन मंत्री भूपेंद्र यादव यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
सध्या 'मुखी' आणि तिचे पाचही बछडे सुखरूप आणि निरोगी आहेत. या भारतात स्वयंपूर्ण आणि आनुवंशिकरित्या वैविध्यपूर्ण चित्त्यांची लोकसंख्या निर्माण करण्याबद्दलचा आशावाद अधिक दृढ झाला आहे. १७ सप्टेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामिबियाहून आणलेल्या आठ चित्त्यांना कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडले होते. हफेब्रुवारी २०२३ मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेतून आणखी १२ चित्ते आयात केले होते.