IAF Wing Commander arrested
नवी दिल्ली: सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महिलेने जाळ्यात ओढून भारतीय हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देशाच्या संरक्षणाशी संबंधित अत्यंत संवेदनशील माहिती मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने हवाई दलाच्या एका विंग कमांडरला मे महिन्यात अटक करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आज (दि. ८) दिली.
पश्चिम सीमेवरील एका फील्ड युनिटमध्ये तैनात असलेल्या या अधिकाऱ्यावर वायुदलाच्या गुप्तचर विभागाने पाळत ठेवली होती. सोशल मीडियावर एका महिलेसोबतच्या त्याच्या चॅटिंगमधून संशय निर्माण झाल्यानंतर गुप्तचर विभागाने सुरक्षा यंत्रणांना याबाबत सतर्क केले होते. "त्याच्यावर बारकाईने पाळत ठेवली जात होती. सध्या त्याला तपास यंत्रणांच्या ताब्यात देण्यात आले आहे," असे भारतीय हवाई दलाच्या प्रवक्त्याने सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकारी कौटुंबिक अडचणींचा सामना करत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून एका अज्ञात महिलेने त्याच्याशी संपर्क साधला. ही महिला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेची हस्तक असल्याचा संशय तपासादरम्यान व्यक्त करण्यात आला आहे. ऑनलाइन चॅटिंग आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांच्यात संवाद वाढला आणि या काळात संबंधित अधिकाऱ्याने अनेक महत्त्वाची संरक्षण गुपिते व कागदपत्रे या महिलेला पुरवल्याचा आरोप आहे.
या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे, संशयित आरोपी अधिकाऱ्याने आपल्या एका सहकाऱ्याच्या मोबाईलमध्ये एक विशिष्ट ॲप इन्स्टॉल करण्यास सांगितले होते. हे ॲप एक प्रकारचे 'स्पायवेअर' किंवा 'मालवेअर' असू शकते, ज्याद्वारे फोनमधील डेटा, लोकेशन आणि संभाषणे हॅक केली जात असल्याचा संशय आहे. सध्या सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.
तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० मे २०२६ रोजी या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले होते. सुरुवातीला पोलीस कोठडीत चौकशी केल्यानंतर दिल्ली न्यायालयाने त्याची तिहार तुरुंगात रवानगी केली. विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांपासून आरोपी न्यायिक कोठडीत असून त्याने अद्याप जामिनासाठी अर्ज केलेला नाही. तपास यंत्रणांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ३० जुलै रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या घटनेमुळे देशाच्या संरक्षण दलातील अधिकाऱ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्ष्य करून चालवल्या जाणाऱ्या 'सायबर हेरगिरी'चा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे.