MiG - 21 Bison Retire :
भारतीय हवाई दलाचा (IAF) 62 वर्षांची गौरवशाली सेवा केलेला आणि अनेक युद्धात शौर्य गाजवणारा प्रसिद्ध लढाऊ विमान MiG-21 Bison आता जंगी स्क्वाड्रन्स मधून अधिकृतपणे सेवानिवृत्त झाले आहे. 26 सप्टेंबर 2025 रोजी चंडीगढ़ येथे एका भव्य समारोहात या फायटर जेटला भावनिक निरोप देण्यात आला. वायुसेना प्रमुख ए पी सिंह यांनी मिग-21 ची शेवटची 'सोलो' उड्डाण घेऊन, त्याला 'वॉटर सल्यूट' (Water Salute) आणि 'फ्लायपास्ट'ने (Flypast) मानवंदना दिली. मिग २१ विमानांची जागा आता भारतीय बनावटीची तेजस विमानं घेणार आहेत.
1963 मध्ये झाले होते दाखल
सोव्हिएत युनियनने बनवलेले हे पहिले सुपरसोनिक जेट 1963 मध्ये भारतीय वायुसेनेत दाखल झाले होते. 1965 आणि 1971 च्या युद्धांमध्ये, 1999 च्या कारगिल संघर्षात आणि 2019 च्या बालाकोट एअर स्ट्राईकमध्येही मिग-21 ने आपला पराक्रम दाखवला होता.
मिग-21 च्या निवृत्तीमुळे आता भारतीय वायुसेनेकडे केवळ 29 फायटर स्क्वाड्रन शिल्लक राहिले आहेत, तर देशाच्या संरक्षणासाठी 42 स्क्वाड्रनची आवश्यकता आहे.
मिग-21 च्या शेवटच्या दोन स्क्वाड्रन, नंबर 23 (पँथर्स) आणि नंबर 3 (कोब्रास) ला नंबर प्लेटेड केले जाईल. याचा अर्थ या स्क्वाड्रन्सची प्रतिष्ठा आणि वारसा कायम ठेवून, त्यांच्या जागी येणाऱ्या नव्या विमानांना हेच ऐतिहासिक क्रमांक दिले जातील. नंबर 3 स्क्वाड्रनला आता एलसीए मार्क 1ए (LCA Mark 1A) तेजस फायटर विमान मिळेल.
रिटायरमेंटनंतर MiG 21 चं काय होणार?
सेवानिवृत्त झाल्यावर हे 'वॉर हॉर्स' विमान भंगारात जाणार नाही, तर त्यांना नवे जीवन मिळणार आहे. या विमानांची नाल एअरबेस'वर संपूर्ण तपासणी होईल. त्यातील सुस्थितीत असलेले सुटे भाग बाजूला काढले जातील आणि विमानांचे सांगाडे संग्रहालये, शैक्षणिक संस्था आणि प्रशिक्षण केंद्रांना दिले जातील. हे सांगाडे मिळवण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला हवाई दलाच्या मुख्यालयात अर्ज करावा लागेल.
चंडीगढमधील इंडियन एअर फोर्स हेरिटेज म्युझियम आणि दिल्लीतील आयएएफ म्युझियम येथे मिग-21 चे प्रदर्शन करण्यात आले आहे. जी संस्था किंवा राज्य सरकार विमानाचे सांगाडे घेईल, त्यांना हवाई दलाच्या नियमांनुसार त्यांच्या रंगरंगोटीची व देखभालीची जबाबदारी घ्यावी लागेल.
सुपरसॉनिक टार्गेटे ड्रोन्समध्ये रूपांतर
काही मिग-21 विमानांना तंत्रज्ञानाच्या मदतीने 'सुपरसोनिक टार्गेट ड्रोन्स' मध्ये रूपांतरित केले जाईल. हे ड्रोन प्रशिक्षणार्थी वैमानिकांना 'कॉम्बॅट ट्रेनिंग' देण्यासाठी वापरले जातील.
वैमानिकांच काय होणार?
मिग-21 च्या वैमानिकांना आता त्यांच्या कारकीर्दीत बदल करण्यासाठी एक ठोस कारण मिळाले आहे. मिग-21 चे अनुभवी फायटर पायलट आता दुसरे फायटर जेट निवडू शकतात. यासाठी त्यांना 3 ते 6 महिन्यांचे विशेष प्रशिक्षण घ्यावे लागेल. विशेष करून या पायलट्सना तेजस विमान उडवण्याचं ट्रेनिंग देण्यात येण्याची शक्यता आहे. याशिवाय, मिग २१ चे पायलट हे टेस्ट पायलट, लॉजिस्टिक्स किंवा प्रशासनात जाऊ शकतात.