लग्नसराईची धूम सुरू; 1 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर तब्बल 'इतके' कोटी होणार विवाह वेदीवर खर्च  pudhari photo
राष्ट्रीय

Wedding economy 2025 :लग्नसराईची धूम सुरू; 1 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर तब्बल 'इतके' कोटी होणार विवाह वेदीवर खर्च

दागिने, वाहन, हॉटेल, कपडे, खाद्यान्न उद्योगाला चालना मिळण्याचे संकेत

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) कपातीमुळे नवरात्र ते दिवाळीपर्यंत सुरू असलेल्या महोत्सवातील उलाढालीचा प्रभाव कायम असतानाच आता लग्नसराईची धूम सुरू झाली आहे. यंदा 1 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत साडेसहा लाख कोटी रुपये विवाह वेदीवर खर्च होतील, असा अंदाज ‌‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स‌’ने वर्तविला आहे.

हॉटेल, लॉन, दागिने, कपडे, पादत्राणे, अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि वाहनांना मागणी वाढेल. येत्या 14 डिसेंबरपर्यंत देशात 46 लाख विवाह संपन्न होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे साडी ते सॅलॉन अशा सर्वच क्षेत्रांत मागणी दिसून येईल. प्रसिद्ध कपडे ब्रँडचे अध्यक्ष एस. एल. पोखर्णा म्हणाले, 1 हजार 499 रुपयांच्या कुर्त्यापासून 85 हजार रुपयांपर्यंतच्या शेरवानीला चांगली मागणी आहे.

आलिशान हॉटेलचे विक्रीप्रमुख शेहझाद अस्लम म्हणाले, गतवर्षी याच कालावधीत झालेल्या 15 विवाह सोहळ्यांतून 11 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. यंदा 18 सोहळ्यांतून 15 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. प्रतिविवाह 90 लाख रुपयांचा खर्च झाला आहे.

हिरे दागिन्यांच्या खरेदीकडे कल

विवाह सोहळ्यातील 15 टक्के खर्च दागिन्यांवर होत असतो. यंदा सोन्याचे भाव वाढल्याने अनेक खरेदीदार 18 कॅरेट सोन्याकडे वळत आहेत. यंदा हिऱ्याच्या दागिन्यांकडे खरेदीदारांचा कल दिसून येत असल्याचे सराफा व्यावसायिक अंकुर डागा आणि रमेश कल्याणरमन यांनी सांगितले. कपडे व्यावसायिक पलक शहा म्हणाल्या, महिलांचा नवीन डिझाईनच्या आणि पारंपरिक साड्या खरेदी करण्याकडे कल आहे. यंदा लग्नसराईतील विक्रीत 10 ते 15 टक्के वाढीचा अंदाज आहे.

काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार, सण आणि विवाहाशी संलग्न उलाढाल 12 ते 14 लाख कोटी रुपयांवर जाईल. त्यात विवाहाचा वाटा चाडेचार ते पाच लाख कोटी रुपये असेल. ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत अर्थगतीची वाढ विवाहाशी संबंधित खरेदीमुळे होईल, असे एचडीएफसीच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ साक्षी गुप्ता म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT