पुढारी ऑनलाईन डेस्क
उत्तर भारतात रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडाला. राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये किमान ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. या राज्यांतील सुमारे ८ लोक बेपत्ता आहेत. विशेषतः उत्तर आणि वायव्य भारतात पावसाचा जोर अधिक राहिला. यामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन, घरांची पडझड झाली. (India Weather)
राजस्थानला मुसळधार सर्वाधिक फटका बसला. येथे १७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर येथील ५ जण बेपत्ता आहेत. हे सर्वजण जयपूरमधील कनोता धरणात पोहोण्यासाठी गेले होते. राजस्थानमधील करौली जिल्ह्यात रविवारी ३८० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. भरतपूरमध्ये बाणगंगाजवळ रीलसाठी पोज देताना ७ तरुणांचा नदीत पडून मृत्यू झाला. जोधपूरमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. येथे ट्रेकिंगदरम्यान कोइलाना तलावात १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला.
राज्यातील मुसळधार पावसादरम्यान पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. "राजस्थानमधील सर्व नागरिकांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आज मुख्यमंत्री कार्यालयात बैठक झाली आणि आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व व्यवस्था तातडीने सज्ज करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत," असे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
पंजाब आणि हरियाणामध्येही अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. हरियाणातील यमुनानगर जिल्ह्यातील सोम नदीचा बंधारा फुटल्याने १५ हून अधिक गावे जलमय झाली आहेत. या गावांत बचाव कार्य सुरु आहे.
पंजाबमधील होशियारपूर येथे रविवारी वाहन पाण्यात वाहून गेल्याने एका कुटुंबातील ८ सदस्यांसह ९ जणांचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी शेतपिके पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान, बचावकार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला (एसडीआरएफ) पाचारण करण्यात आले आहे.
हिमाचल प्रदेशात, भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे ३ मुलींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर एक व्यक्ती बेपत्ता आहे. येथील सुमारे २८० रस्ते बंद झाले आहेत. तसेच ४५८ वीज आणि ४८ पाणीपुरवठा योजनांवर परिणाम झाला आहे.
उत्तर प्रदेशातील जालौनमध्ये पावसामुळे घराचे छत कोसळल्याने एक महिला आणि तिच्या सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. उत्तराखंडमध्ये भिंबली येथे झालेल्या भूस्खलनाने मंदाकिनी नदीचा प्रवाह काही काळ रोखून धरला होता.
दिल्लीत मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. यामुळे वाहतूक कोंडी झाली. शनिवारी रोहिणीच्या सेक्टर २० येथील एका सात वर्षांच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. रविवारी बालटाल मार्गावरील अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पहलगाम मार्ग बुधवारी देखभालीच्या कामासाठी बंद करण्यात आल्याने आता दोन्ही मार्गांवरील यात्रा थांबवण्यात आली आहे.