नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत आणि अमेरिका यांच्यातील बहुप्रतीक्षित व्यापार करारावर भाष्य करताना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी भारतीय शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले आहे. दुसरीकडे, विरोधकांनी या करारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संसदेत सविस्तर चर्चेची मागणी केली आहे.
एका मुलाखतीदरम्यान गोयल म्हणाले की, अमेरिकन बाजारपेठ भारतीय शेतकऱ्यांच्या मालाला मोठे मूल्य मिळवून देईल. यामुळे त्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होईल. हा करार अंतिमतः आपल्या शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरेल. भारतीय शेतकरी आणि मत्स्य उत्पादक आधीच 55 अब्ज अमेरिकन डॉलर्सची निर्यात करत आहेत, या कराराने त्याला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दोन पानांच्या दस्तऐवजात सर्व काही सामावणे अशक्य
दोन पानांच्या संक्षिप्त दस्तऐवजात सर्व तांत्रिक बाबींचा समावेश करता येत नाही, असे स्पष्ट करत गोयल यांनी सांगितले की, पुढील पाच वर्षांत जगभरातून होणारी आयात 2 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचेल. याचा अर्थ अमेरिकन उत्पादनांना मोठी मागणी असेल. तत्पूर्वी शनिवारी एका सविस्तर पत्रकार परिषदेत त्यांनी या अंतरिम व्यापार /...4
करारातील मुख्य तरतुदींची माहिती दिली होती. केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी शुल्कातील कपातीची माहिती दिली. काही वस्तूंवर झिरो टॅरिफ आणि झिरो ड्युटी असेल, याची पुष्टी करत त्यांनी निर्यातदार, शेतकरी आणि लघू व मध्यम उद्योगांना यातून मोठा फायदा होईल, असे सांगितले. भारताची जागतिक बाजारपेठेतील व्याप्ती वाढवणे हे या कराराचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
विरोधकांची टीका : धोकादायक करारावर संसदेत चर्चा व्हावी
दुसरीकडे शिवसेना (यूबीटी) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या अंतरिम व्यापार करारावरून एनडीए सरकारवर जोरदार निशाणा साधला. हा करार देशाला धोका देणारा असल्याची टीका त्यांनी केली.