Apache AH-64E helicopters delivery India Army India US defence deal Western border deployment capabilities Indian Defence Procurement
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारताने आपल्या सीमावर्ती सुरक्षेला अधिक भक्कम करण्यासाठी संरक्षण क्षेत्रात मोठी पावले उचलली आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराला लवकरच अपाचे एएच-64ई (Apache AH-64E) लढाऊ हेलिकॉप्टर्सचा पहिला ताफा मिळणार आहे.
या हेलिकॉप्टर्सच्या ताफ्याची डिलिव्हरी तब्बल 15 महिन्यांच्या विलंबानंतर जुलै महिन्यात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 15 जुलैपर्यंत ही हेलिकॉप्टर्स मिळू शकतात.
मार्च 2024 मध्ये जोधपूर येथे आर्मी एव्हिएशन कॉर्प्सकडून या हेलिकॉप्टर्सची मागणी करण्यात आली होती. मात्र, अमेरिका व भारत यांच्यात 2020 मध्ये झालेल्या 60 कोटी डॉलरच्या करारानंतरदेखील डिलिव्हरी सतत पुढे ढकलली गेली.
मे-जून 2024 मध्ये या हेलिकॉप्टर्सची डिलिव्हरी अपेक्षित होती. अमेरिकेतील तांत्रिक अडचणी व पुरवठा साखळीतील व्यत्ययामुळे डिलिव्हरी डिसेंबर 2024 पर्यंत लांबली होती.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्याकडे हेलिकॉप्टर्स व एलसीए तेजससाठी आवश्यक असलेल्या GE F404 इंजिनांच्या डिलिव्हरीला गती देण्याची मागणी केली होती. त्यानंतर एप्रिल 2025 मध्ये इंजिनांची पहिली खेप भारतात आली.
मॉडेल: Apache AH-64E
टार्गेटिंग सिस्टम: आधुनिक सेंसर व लक्ष्य भेदक प्रणाली
शस्त्रास्त्र: हेलफायर क्षेपणास्त्रे, 30 मिमी चेन गन
वॉरफेअर क्षमता: कमी उंचीवरून उड्डाण करून अचूक लक्ष्य भेदण्याची क्षमता
संवाद प्रणाली: नेटवर्क सेंट्रिक युद्धासाठी उपयुक्त असलेल्या संवाद प्रणाली
भारतीय वायुसेनेकडे यापूर्वीच 22 अपाचे हेलिकॉप्टर्सची तुकडी आहे, परंतु भारतीय लष्करासाठी केलेल्या या नव्या खरेदीचा उपयोग प्रत्यक्ष सीमेवर लष्कराच्या ऑपरेशन्समध्ये होणार आहे. हे हेलिकॉप्टर्स विशेषतः पाकिस्तान सीमेलगतच्या पश्चिम सीमेवर तैनात करण्यात येणार आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर संरक्षण खात्याने तातडीने अत्याधुनिक उपकरणांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये एकूण 19.82 अब्ज रुपयांचे (अंदाजे $ 231.6 दशलक्ष) 13 करार करण्यात आले आहेत.
या खरेदीत समाविष्ट प्रमुख उपकरणे:
इंटिग्रेटेड ड्रोन डिटेक्शन अँड इंटरडिक्शन सिस्टीम (IDDIS)
लो लेव्हल लाईटवेट रडार (LLLR)
व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स मिसाईल लाँचर
भारतीय लष्करासाठी अपाचे AH-64E हे एक महत्त्वाचे सामरिक साधन ठरणार आहे. आधुनिक युद्धशास्त्राच्या निकषांनुसार तयार करण्यात आलेल्या या हेलिकॉप्टर्समुळे भारतीय लष्कराच्या ऑपरेशनल क्षमतेत मोठी भर पडणार आहे. आगामी काळात हे हेलिकॉप्टर्स प्रत्यक्ष रणभूमीवर किती परिणामकारक ठरतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.