बंगळूर : भारत सध्या जागतिक अर्थव्यवस्थेत पाचव्या क्रमांकावर असून आपल्याला तिसर्या क्रमांकावर पोहोचण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी अधिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. सर्वांचे सहकार्यही आवश्यक आहे. भारत लवकरच तिसरी आर्थिक महाशक्ती होणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने पाकला गुडघ्यांवर आणले आणि आपली ताकद पूर्ण जगाला दाखवून दिली, असेही प्रतिपादन त्यांनी केले. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये बंगळूरच्या तंत्रज्ञानाचे मोठे योगदान आहे, असे कौतुकही त्यांनी केले.
बेळगाव-बंगळूर, नागपूर (अजनी)-पुणे आणि अमृतसर-वैष्णोदेवी कटरा या तीन वंदे भारत रेल्वेसेवांचे उद्घाटन रविवारी बंगळूरच्या मॅजेस्टिक रेल्वे स्थानकावर केल्यानंतर पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे पावले उचलण्याची गरज आहे. देशातील जनतेच्या हितासाठी एकत्र काम केले पाहिजे. 2014 पूर्वी देशात फक्त 5 शहरांमध्ये मेट्रो रेल्वे होती. आज आम्ही ती 24 शहरांमध्ये वाढवली आहे. भारत हा जगातील सर्वात मोठी मेट्रो रेल्वेव्यवस्था असलेला तिसरा देश आहे. रेल्वे आधुनिकीकरण ही आमची प्राथमिकता असून 2014 पर्यंत 20 हजार कि.मी.चे विद्युतीकरण झाले होते. त्यांची संख्या आता 40 हजारांपर्यंत वाढली आहे. विमानतळांची संख्या 74 वरून 160 पर्यंत वाढली आहे.
सोहळ्याला कर्नाटक राज्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा, मंत्री दिनेश गुंडूराव आदी उपस्थित होते.
बंगळूर हे जागतिक आयटी हब व नवीन भारताच्या उदयाचे प्रतीक आहे. भारतीय अर्थव्यवस्था जगात सध्या पाचव्या स्थानी आहे. ती तिसर्या स्थानी आणण्यासाठी सगळ्यांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील. केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार, आम्ही नागरिकांच्या सेवेत आहोत. आपण एकत्र काम करून देशवासीयांचे हित जोपासत नवनवीन उपाययोजना आखल्या पाहिजेत, असेही पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान पुढे म्हणाले, मेक इन इंडियामुळे शस्त्रांची आयात कमी झाली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पहिल्यांदाच मी बंगळूरला आलो असून काही तासांत पाकिस्तानवर हल्ला करून आपण जगाला भारताचे खरे स्वरूप दाखवून दिले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशामागे मेक इन इंडियाची शक्ती आहे. बंगळूर व त्यांच्या तंत्रज्ञांचे योगदान मोठे आहे. हे ऑपरेशन यशस्वी करणार्या बंगळूरच्या तरुणांचे मी अभिनंदन करतो. संपूर्ण जगाला अभिमान वाटावा, अशी तांत्रिक कामगिरी बंगळूरने केली आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून संपूर्ण जग भारतीय सैनिकांच्या शौर्याचे साक्षीदार बनले. या मोहिमेतील तंत्रज्ञानात बंगळूरचे मोठे योगदान आहे, असे सांगून बंगळूरवासीयांचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आयआयआयटी सभागृहात यलो लाईन मेट्रो ट्रेनचे उद्घाटन व मेट्रोच्या तिसर्या टप्प्याची पायाभरणीही त्यांच्या हस्ते झाली.
पंतप्रधान जोदी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर, कर्नाटकातील रेल्वे पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक सुमारे 9 टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते म्हणाले, 2014 पूर्वी कर्नाटकाला दिला जाणारा सरासरी वार्षिक रेल्वे निधी फक्त 835 कोटी रुपये होता. मात्र 2025-26 या आर्थिक वर्षात तो 7 हजार 564 कोटी रुपयांवर गेला आहे. सध्या कर्नाटकच्या रेल्वे नेटवर्कमध्ये 54 हजार कोटी गुंतवणूक केली आहे. अमृत भारत स्थानक कार्यक्रमांतर्गत 61 स्थानकांची पुनर्बांधणी केली जात आहे. 123 फ्लायओव्हर व अंडरपासचे बांधकाम सुरू आहे. विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. गेल्या 11 वर्षांत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन 6 पटीने वाढले आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन 12 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असून 8 पटीने वाढले असल्याची माहिती त्यांनी दिली.
भारत हा जगातील दुसर्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश आहे. भारत हा अमेरिकेला स्मार्ट फोनचा मोठा पुरवठादार आहे, असेही रेल्वे मंत्र्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत रेल्वेचे उद्घाटन करून यनगर ते रागीगुड्डा व इलेक्ट्रॉन सिटीपर्यंत रेल्वेतून प्रवास केला. यादरम्यान त्यांनी लहान मुलांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी बंगळूरच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या तिसर्या टप्प्याची पायाभरणी केली.
सध्याच्या रेल्वे सेवांच्या तुलनेत बंगळूर-बेळगाव प्रवासाच्या वेळेत 1 तास 20 मिनिटे व बेळगाव-बंगळूर प्रवासाच्या वेळेत 1 तास 40 मिनिटांची बचत होणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. हाय स्पीड वंदे भारत ट्रेन (क्रमांक 06575) बेळगावहून रोज पहाटे 5.20 वा. निघेल. ती बंगळूरला दुपारी 1.50 वाजता पोहोचेल. पुन्हा बंगळूर येथून दुपारी 2.20 वा. निघून रात्री 10.40 ला पुन्हा बेळगावला पोहोचणार आहे. यादरम्यान यशवंतपूर, तुमकूर, दावणगेरे, हावेरी, हुबळी व धारवाड स्थानकांवर रेल्वे थांबणार आहे. बुधवार वगळता रोज ही रेल्वे धावणार आहे.
बंगळूर-बेळगाव वंदे भारत रेल्वेचे तिकीट दर नियमित आसनासाठी 1,264 रुपये, तर विशेष आसनासाठी 2,535 रुपये निश्चित करण्यात आले आहे.