पाकव्‍याप्‍त काश्‍मीरमध्‍ये झालेल्‍या हिंसाचाराचा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी तीव्र शब्दांत निषेध केला. Pudhari
राष्ट्रीय

PoK violence : 'स्वतःचे अपयश लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न'; पाकव्याप्त काश्मीरमधील 'अमानुषते'वरून भारताचा पाकिस्तानवर हल्लाबोल

५० हून अधिक ब्रिटिश खासदारांनी हिंसाचारावर व्‍यक्‍त केली चिंता

पुढारी वृत्तसेवा

PoK violence India slams Pakistan : पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या भीषण हिंसक चकमकीत ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे २०० जण जखमी झाले आहेत. या हिंसाचाराचा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी तीव्र शब्दांत निषेध केला.

पाकिस्‍तानकडून स्वतःचे अपयश लपवण्याचा प्रयत्‍न

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, नवी दिल्लीने या आंदोलनांच्या संदर्भात पाकिस्तानमधून येणाऱ्या फेक न्यूज आणि व्हिडिओंचे एक ठराविक स्वरूप पाहिले आहे. पाकिस्‍तानी माध्‍यमाने वास्‍तवावर पडदा टाकला असून हा स्वतःचे अपयश लपवण्याचा आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनावरून लक्ष विचलित करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आहे."

'पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोलिसांची अमानुषता'

जयस्वाल यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांवर अतिबळाचा वापर होत असल्याच्या अहवालांचाही उल्लेख केला. "पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोलिसांच्या अमानुषतेचे अहवाल समोर आले आहेत. या आंदोलनात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि बरेच जण जखमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय समुदाय पाकिस्तानला त्याच्या गैरकृत्यांसाठी आणि अत्याचारांसाठी जबाबदार धरेल, अशी आम्हाला आशा आहे," असेही ते म्हणाले.

अनेक शहरांमध्ये आंदोलनाचा वणवा

आंदोलक आणि पाकिस्तानी सुरक्षा दलांमधील प्राणघातक चकमकींनंतर संपूर्ण पाकव्याप्त काश्मीरमध्ये तणाव सातत्याने वाढत असतानाच जयस्वाल यांचे हे वक्तव्य आले आहे. रावळकोट आणि मुझफ्फराबादमधील हिंसेनंतर अनेक भागांत बंद पुकारण्यात आला असून संवाद सेवा विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे. भीमबर आणि कोटलीसह अनेक शहरांमध्ये हे आंदोलन पसरले असून शेकडो लोक सरकारविरोधी निदर्शनांमध्ये सहभागी झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावरही वेधले लक्ष

या असंतोषाने आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही लक्ष वेधून घेतले आहे. ५० हून अधिक ब्रिटिश खासदारांनी ब्रिटनच्या परराष्ट्र सचिव इव्हेट कूपर यांना पत्र लिहून पाकव्याप्त काश्मीरमधील इंटरनेट-संपर्क बंदी (कम्युनिकेशन ब्लॅकआउट), अटक सत्र आणि वाढत्या तणावावर चिंता व्यक्त केली आहे. ब्रिटिश खासदारांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, ब्रिटनमध्ये राहणाऱ्या काश्मिरी लोकांना या भागातील आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत. तसेच, येथील संवाद निर्बंधांमुळे आधीच संवेदनशील असलेली परिस्थिती आणखी बिघडण्याचा धोका आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT