Asif Ali Zardari | झरदारींना उपरती!

Asif Ali Zardari |
Asif Ali Zardari | झरदारींना उपरती!(Pudhari File Photo)
Published on
Updated on

इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराण युद्धाने रौद्र रूप धारण केले असून, संपूर्ण आखातच पेटले आहे. इराणची राजधानी तेहरानपासून ते लेबनॉन तसेच आखाती देश आणि होर्मुझ सामुद्रधुनीपर्यंत युद्धाच्या कृष्णसावल्या पसरल्या आहेत. मध्यपूर्वेत तणावाची आग पसरत असतानाच अफगाणिस्तानच्या लष्कराने सरहद्दीवरील पाकिस्तानच्या 16 लष्करी तळांवर जबरी हल्ले चढवले. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये ठिकठिकाणी चकमकी झाल्या. अफगाणिस्तानच्या आगळिकीला चोख उत्तर दिले असून खैबरपख्तुनख्वा विभागात घुसखोरी केलेल्या अफगाण सैनिकांचा खात्मा केल्याचा दावा पाकने केला आहे.

अफगाणिस्तानदेखील पाकच्या अनेक सैनिकांना यमसदनास पाठवल्याचे सांगत आहे. या देशांत मतभेद निर्माण झाले, ते दोन्ही देश दहशतवादात गुरफटल्यानेच. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने निष्कारण भारतावर शरसंधान साधले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनात भाषण करताना भारत आणखी एका युद्धाची तयारी करत आहे, असा आरोप पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी केला; मात्र त्यांनी लगेचच शांततापूर्ण वाटाघाटी करण्याचे आवाहनही भारताला केले असून, प्रादेशिक सुरक्षिततेसाठी संवाद हाच एकमेव मार्ग आहे, असे म्हटले आहे. स्वतःला रणभूमीपासून दूर ठेवून पाकिस्तानबरोबर अर्थपूर्ण वाटाघाटी कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. वास्तविक, भारताने युद्धाची तयारी करून पाक सीमेपाशी सैन्याची जमवाजमव केली, असे बिलकूल नाही. भारताने पाकिस्तानला अधिकृतरीत्या युद्धाचा इशारा दिला आहे अथवा नौदल, हवाईदल आणि भूदल यांना युद्धासाठी सज्ज राहण्याचा आदेश दिला आहे, असेही घडलेले नाही. त्यामुळे भारत पाकिस्तानविरुद्ध युद्धाची तयारी करत आहे, हा आरोपच निराधार आहे.

भारतासमोर पाकिस्तान हा लष्करी व आर्थिकद़ृष्ट्या किरकोळ देश असून, कोणत्याही तयारीविना भारत पाकिस्तानला सुतासारखा सरळ करू शकतो, हा इतिहास आहे. प्रत्येकवेळी भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे. वाकड्या नजरेने पाहू नका, असा इशारा ‘सर्जिकल स्ट्राईक’द्वारे भारताने पाकला दिला होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी छावण्या उद्ध्वस्त करण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. तेव्हापासून उभय देशांतील राजनैतिक आणि लष्करी संबंध ताणले आहेत. झरदारी यांच्या युद्धाच्या या नव्या आरोपामुळे हे संबंध अधिकच बिघडणार आहेत. एकीकडे अफगाण सीमेवरून होणार्‍या हल्ल्यांबाबत पाकच्या अध्यक्षांनी तीव— संताप व्यक्त केला आहे. दोहा करारातील अटींचे पालन न केल्याचा आरोप त्यांनी अफगाण नेतृत्वावर केला. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी यासारख्या दहशतवादी संघटनांना अफगाणिस्तानची फूस आहे.

त्यामुळे पाकिस्तानचा संयम संपला असून, कोणत्याही बाह्य वा देशांतर्गत शक्तीला पाकिस्तानची शांतता भंग करू दिली जाणार नाही, असे उद्गार झरदारी यांनी काढले आहेत. मुळात पाकिस्तान आतूनच उद्ध्वस्त झालेला आहे. तेथील सरकारच लुळेपांगळे असून, पोपटपंची करण्यापलीकडे अध्यक्षांना कोणतेही दुसरे काम नाही. झरदारी यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी हा पक्ष अत्यंत कमजोर अवस्थेत आहे. खुद्द झरदारी हे पत्नी बेनझीर भुत्तो पंतप्रधान असताना ‘मिस्टर टेन पर्सेंट’ म्हणून कुविख्यात झाले होते. त्यांच्याविरुद्ध भ—ष्टाचाराचे आरोप झाले होते. खामेनी यांच्या हत्येनंतर पाकव्याप्त गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये हिंसक निदर्शने झाली. देशात इतरत्रही मोर्चे निघाले. अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करावी लागली. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरही संघर्ष सुरू आहे. त्यातच अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध सुधारत असल्यामुळे पाकिस्तान भडकला आहे. अफगाणिस्तान आणि भारत हे पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करत आहेत, असा संशयही झरदारी यांनी व्यक्त केला.

वास्तविक, अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणला बेचिराख करण्याच्या दिशेने हल्ले सुरू ठेवले असून, त्यामुळे पाकिस्तान हादरला. कारण, पाकिस्तान आणि इराण यांच्यात 9000 किलोमीटरची सीमा आहे. इराणमधील लष्करी संघर्षामागे अंतिमतः पाकिस्तानला मांडलिक देश बनवण्याची झिओनिस्ट योजना आहे. इराणमध्ये इस्रायलचा विजय झाल्यास त्याचे अफगाणिस्तान व भारतावरही परिणाम होणार आहेत, असे मत पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी व्यक्त केले आहे. ज्यूंची भूमी संरक्षित करणे आणि आपल्या प्रभाव क्षेत्राचा विस्तार करणे, यासाठी झिऑनिझमची चळवळ सुरू आहे. 1948 मध्ये इस्रायलचा जन्म झाल्यानंतर झिऑनिस्ट विचारसरणीमुळेच मुस्लीम जगतात संघर्ष झाले.

जागतिक अर्थव्यवस्थेवरही झिऑनिस्टांचा पगडा आहे. इराणवर मात केल्यानंतर सीमाभागात इस्रायलचे वर्चस्व निर्माण होण्याची भीती पाकला वाटते. ज्या क्षणी इस्रायलचा विजय होईल, त्या क्षणी भारत, अफगाणिस्तान आणि इराण हे पाकिस्तानविरोधात एकत्र येतील, अशी भीती आसिफ यांनी व्यक्त केली आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू आणि मोदी यांनी दोन्ही देशांतील राजकीय संबंधांत खूपच सुधारणा घडवली आहे. इस्रायलकडून भारताने मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक संरक्षण सामग्री घेतली आहे; परंतु भारताने कधीही पाकिस्तान विरोधात आक्रमण केलेे नाही, तरीदेखील पाकिस्तान सतत भारताचा बागुलबुवा निर्माण करून पाक जनतेची दिशाभूल करत असतो.

गेल्यावर्षीही पहलगाम हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईवेळी पंतप्रधान मोदी हे राजकीय फायद्यासाठी या प्रदेशाला अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर ढकलत असल्याचा बेलगाम आरोप आसिफ यांनी केला होता. पाकच्या संसदेत काही खासदारांची घाबरगुंडी उडून ते रडले होते. पाक सरकारने गयावया करून युद्ध थांबवण्याची विनंती केली. आता भारताशी शांततापूर्ण वाटाघाटी करण्याची तयारी झरदारी यांनी दाखवली असून, चहूकडून कोंडी झाल्यामुळे पाकिस्तान जवळजवळ लोटांगण घालण्यास तयार झालेला दिसतो. पाकच्या राज्यकर्त्यांनी ही भूमिका विद्यमान परिस्थिती पाहून दाखवलेली दिसते, हे लक्षात घ्यावे लागेल. पाकिस्तानची मूळ जहाल व विध्वंसक प्रवृत्ती जाणार नाही. त्यामुळे दहशतवादाच्या मार्गावर चालणे पाकिस्तान जोवर सोडत नाही, तोवर पाकच्या या आवाहनाकडे गांभीर्याने पाहता येणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news