प्रतीकात्मक छायाचित्र File Photo.
राष्ट्रीय

Energy Crisis | युद्धझळांमध्ये मोठा दिलासा! भारताच्या आणखी 2 LPG टँकर्सना होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्याची इराणकडून परवानगी

Energy Crisis | ९०,००० टनांहून अधिक एलपीजी घेऊन जाणारे टँकर्स बंद असलेल्या सामुद्रधुनी केली पार

पुढारी वृत्तसेवा

Energy Crisis

तेहरान : अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील तणाव कायम असताना आज (दि. २८ मार्च) भारतासाठी मोठा दिलासा देणारे वृत्त समोर आले आहे. इराणने संघर्षाच्या काळात भारत आणि इतर चार "मित्र राष्ट्रांना" या जलमार्गातून आपली जहाजे नेण्याची परवानगी दिली जाईल, असे सांगितल्यानंतर भारताकडे जाणारे आणखी दोन एलपीजी टँकर्स संवेदनशील होर्मुझच्या सामुद्रधुनीतून गेले. शिपिंग डेटानुसार, बीडब्ल्यू ईएलएम आणि बीडब्ल्यू टीवायआर टँकर्सनी युद्धाच्या सुरुवातीपासून प्रभावीपणे बंद असलेल्या या उच्च-जोखमीच्या कॉरिडॉरमधून प्रवास केला. ओमानच्या आखाताच्या दिशेने जात होते.

आणखी पाच भारतीय टँकर्स अजूनही संयुक्त अरब अमिरातीजवळ

'इंडिया टूडे'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, ९०,००० टनांहून अधिक एलपीजी (स्वयंपाकाचा गॅस) घेऊन जाणारे हे दोन भारतीय ध्वज असलेले टँकर्स आखातातून बाहेर पडताना एकमेकांच्या जवळून गेले आणि त्यांनी सुमारे २७ किमी/तास वेग कायम ठेवला. प्रामुख्याने कच्चे तेल घेऊन जाणारे आणखी सुमारे पाच भारतीय टँकर्स अजूनही संयुक्त अरब अमिरातीजवळील पाण्यात नांगरून आहेत आणि या सामुद्रधुनीतून जाण्यासाठी परवानगीची वाट पाहत आहेत. एकूण २० भारतीय ध्वज असलेली जहाजे आखातात अडकली आहेत. याशिवाय, या प्रदेशात अडकलेल्या आपल्या रिकाम्या जहाजांमध्ये भारत एलपीजी भरत आहे, असे रॉयटर्सने वृत्त दिले आहे.

इराणने दिली पाच मित्र राष्ट्रांसाठी सुरक्षित प्रवासाची हमी

जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतुकीच्या अडथळ्यांपैकी एक असलेल्या होर्मुझबाबत इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी तेहरानची भूमिका स्पष्ट केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घडामोड समोर आली आहे. अराघची यांनी सरकारी टीव्हीला सांगितले की, चीन, रशिया, भारत, इराक आणि पाकिस्तान या पाच 'मित्र राष्ट्रांच्या' टँकर्सना सुरक्षित मार्ग दिला जाईल. त्याच वेळी, त्यांनी असा इशाराही दिला की इराणच्या शत्रूंशी संबंधित जहाजांना नाकेबंदीचा सामना करावा लागेल.

आतापर्यंत चार भारतीय जहाजांनी केला होर्मुझची सामुद्रधुनीतून प्रवास

एक महिन्यापूर्वी युद्ध सुरू झाल्यापासून, जग वसंत, पाइन गॅस, शिवालिक आणि नंदा देवी या किमान चार भारतीय ध्वज असलेल्या जहाजांनी या सामुद्रधुनीतून प्रवास केला आहे. जहाजाच्या मार्गाच्या माहितीवरून असे दिसून आले की, ९०,००० टनांहून अधिक एलपीजी घेऊन जाणाऱ्या 'जग वसंत' आणि 'पाइन गॅस' या जहाजांनी अरबी समुद्रातून जाणारा लहान मार्ग घेण्याऐवजी एक असामान्य मार्ग निवडला आणि इराणच्या लारक व केशम बेटांमधून होर्मुझ महासागर ओलांडला.

होर्मुझची सामुद्रधुनीतून भारताची सुमारे ५०% ऊर्जा आयात

भारत आपल्या ऊर्जेच्या गरजांपैकी ९०% आयात करतो. आता भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना इराणकडून मिळालेल्या परवानगीमुळे भारताला एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण भारताची सुमारे ५०% ऊर्जा आयात याच मार्गातून होते. गेल्या दोन आठवड्यांत या जलमार्गातील सागरी वाहतूक अत्यंत कमी झाल्यामुळे भारताला स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्यात अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे घरगुती वापरकर्त्यांनी घाबरून सिलिंडर खरेदी करण्यास सुरुवात केली आणि काही रेस्टॉरंटना तात्पुरते बंद ठेवण्यास किंवा त्यांच्या मेनूमध्ये कपात करण्यास भाग पडले. मात्र, आता इराणने भारतीय टँकरना येथून जाण्याची परवानगी दिल्याने येत्या काही आठवड्यांत परिस्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT