PM Modi GTA 6 Post Pudhari
राष्ट्रीय

PM Modi GTA 6 Post: १३ वर्षांत भारत किती बदलला? GTA 6च्या निमित्ताने मोदींचा काँग्रेसवर निशाणा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

PM Modi GTA 6 Post: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी GTA 6 या लोकप्रिय व्हिडिओ गेमच्या लाँचचा आधार घेत २०१३ पासून भारतात झालेल्या बदलांचा आढावा मांडला आहे.

Rahul Shelke

PM Modi GTA 6 Post: GTA 6 या लोकप्रिय व्हिडिओ गेमचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या प्रगतीचा आढावा मांडला आहे. २०१३ मध्ये GTA 5 लाँच झाला होता, तर आता १३ वर्षांनंतर GTA 6 लाँच झाला आहे. या दोन गेमच्या लाँचमधील काळाचा संदर्भ देत मोदींनी भारतात झालेल्या बदलांची तुलना केली आहे. 'भारत आता एक वेगळाच खेळ खेळत आहे' (India is playing a whole new game), असे म्हणत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तत्कालीन यूपीए सरकारवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

पंतप्रधान मोदींच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. GTA या गेमच्या पोस्टरमध्ये वापरल्या जाणाऱ्या खास फॉन्टचा वापर करून भारताच्या प्रगतीची माहिती देण्यात आली आहे. २०१३ मधील भारत आणि आजचा भारत यांची तुलना करताना देशाने विविध क्षेत्रांत केलेल्या प्रगतीचे मुद्दे मांडले आहेत.

'Fragile 5' मधून भारत बाहेर

या पोस्टमध्ये भारताच्या आर्थिक प्रगतीचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. २०१३ मध्ये भारताचा समावेश 'Fragile 5' म्हणजेच आर्थिकदृष्ट्या अस्थिर मानल्या जाणाऱ्या पाच देशांच्या गटात होता. मॉर्गन स्टॅन्लेच्या एका विश्लेषकाने ऑगस्ट २०१३ मध्ये हा शब्द वापरला होता.

भारतासह ब्राझील, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका आणि तुर्की या देशांचा त्यात समावेश होता. परदेशी गुंतवणुकीवर अधिक अवलंबून असल्याने या देशांच्या अर्थव्यवस्थांना जागतिक आर्थिक बदलांचा धोका असल्याचे मानले जात होते.

मात्र, आज भारत या गटातून बाहेर पडला असून जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक बनला असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.

स्वच्छता, सौरऊर्जा आणि अंतराळ क्षेत्रातील प्रगती

देशातील स्वच्छता मोहिम, सौरऊर्जा निर्मिती क्षमतेत झालेली मोठी वाढ आणि वीज पोहोचवण्याच्या कामातील प्रगती यांचाही पोस्टमध्ये उल्लेख आहे. याशिवाय, देशातील नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्याचा आणि भारत संरक्षण साहित्याची निर्यात करणारा महत्त्वाचा देश म्हणून पुढे येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

इंटरनेटचा खर्च ३०८ रुपयांवरून थेट ७.५१ रुपयांवर

पोस्टमध्ये मोदींनी इंटरनेटच्या किमतीतील बदलाचाही उल्लेख केला आहे. २०१३ मध्ये एक जीबी हायस्पीड इंटरनेटसाठी सुमारे ३०८ रुपये खर्च करावे लागत होते. आता हाच खर्च कमी होऊन ७.५१ रुपये प्रति जीबी झाल्याचे पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी GTA 6 च्या लाँचचा आधार घेत त्यांनी सरकारच्या कामगिरीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

काही मिनिटांतच पोस्टला हजारो लाईक्स

मोदींच्या या पोस्टला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. पोस्ट शेअर केल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत जवळपास ६० हजार लाईक्स आणि २ हजार कमेंट्स आल्या आहेत. अनेक युजर्सनी या पोस्टचे कौतुक केले. एका युजरने 'आतापर्यंतचे सर्वात कूल पंतप्रधान' अशी प्रतिक्रिया दिली. तर काहींनी मोदींना आपला आवडता इन्फ्लुएन्सर आणि 'OG क्रिएटर' असेही म्हटले.

GTA 6 च्या लाँचची जगभरात चर्चा

दरम्यान, GTA 6 हा गेम गुरुवारी मध्यरात्री लाँच झाला. याआधी या मालिकेतील GTA 5 हा गेम २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यामुळे तब्बल १३ वर्षांनंतर आलेल्या नव्या गेमबद्दल गेमर्समध्ये प्रचंड उत्सुकता होती.

या गेमच्या निर्मितीसाठी एक अब्ज डॉलरपेक्षा अधिक खर्च झाल्याचा अंदाज आहे. डिजिटल इंटेलिजन्स कंपनी सेन्सर टॉवरच्या माहितीनुसार, गेमच्या प्री-ऑर्डरमधून आतापर्यंत सुमारे १.१ अब्ज डॉलरचा महसूल मिळाला आहे.

एकीकडे GTA 6 च्या लाँचची जगभरात चर्चा सुरू असताना, दुसरीकडे याच गेमच्या लोकप्रियतेचा आधार घेत पंतप्रधान मोदींनी भारताच्या १३ वर्षांतील बदलांचा लेखाजोखा मांडला आहे. त्यामुळे त्यांची ही पोस्ट गेमर्ससोबतच राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT