केंद्रीय गृहमंत्री अमित शहा File Photo
राष्ट्रीय

Pahalgam Terror Attack | पाण्याच्या एका थेंबासाठीही पाकिस्तान तरसणार, सिंधू जल कराराच्या निर्णयावर भारताची योजना

गृहमंत्री अमित शाहांच्या निवासस्थानी बैठकीत निर्णय

पुढारी वृत्तसेवा

Pahalgam Terror Attack

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार स्थगित केला आहे. आता भारत सरकार या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी उच्च-स्तरीय बैठक झाली. या बैठकीमध्ये पाण्याच्या नियोजनासाठी योजना आखण्यात आली आहे. पाकिस्तानला एकही थेंब पाणी गेले नाही पाहिजे, असा निर्णय बैठकीत झाल्याचे समजते.

उच्चस्तरीय बैठकीला गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील म्हणाले की, केंद्राने भारतीय नद्यांचे पाणी पाकिस्तानला जाऊ नये यासाठी एक सविस्तर रोडमॅप तयार केला आहे. नद्यांमधून गाळ काढण्यासह तात्काळ पावले उचलणे प्राधान्याने केले जाईल. बैठकीत तीन पर्यायांवर चर्चा करण्यात आली. सरकार अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर काम करत आहे जेणेकरून एक थेंबही पाणी पाकिस्तानला जाऊ नये. लवकरच, पाणी थांबवण्यासाठी आणि ते वळविण्यासाठी नद्यांमधून गाळ काढण्याचे काम सुरु केले जाईल, असे केंद्रीय मंत्री पाटील म्हणाले.

भारतात सिंधू नदीचे पाणी साठवण्यासाठी धरणांची क्षमता वाढवण्यावर बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने धरणांची क्षमता वाढवली जाईल, जेणेकरून अधिक पाणी साठवता येईल. धरणांची क्षमता वाढवण्यासाठी त्यांच्या तळाशी असलेला गाळ काढून टाकण्यावरही चर्चा झाली. गाळ साफसफाईसाठी लवकरच संपूर्ण योजना तयार करण्यास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. तसेच, बैठकीत चर्चा झाली की हा करार जागतिक बँकेने केला आहे, त्यामुळे त्यांना भारत सरकारच्या या निर्णयाची माहिती देखील दिली जाईल. निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, असे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, सिंधू जल करार रद्द करण्याच्या निर्णयाची माहिती भारताने पाकिस्तानलाही दिली आहे. जलशक्ती मंत्रालयाचे सचिव देवश्री मुखर्जी यांनी पाकिस्तानच्या जलसंपदा मंत्रालयाचे सचिव सय्यद अली मुर्तझा यांना पत्र लिहिले आहे. पत्राद्वारे त्यांनी पाकिस्तानला सिंधू जल करार तात्काळ स्थगित करण्याच्या निर्णयाची औपचारिक माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT