India Pakistan Tension
नवी दिल्ली : माध्यमांनी संरक्षण दलाच्या कारवायांचे आणि हालचालीचे थेट प्रक्षेपण करु नये, असे सल्लागार केंद्र सरकारने शुक्रवारी जारी केले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तिसऱ्यांदा केंद्र सरकारने हे सल्लागार जारी केले आहे. भारत-पाक वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक माध्यम वाहिन्या लष्करी कारवायांचे थेट प्रक्षेपण करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर केंद्र सरकारने हे सल्लागार पुन्हा जारी केले आहे.
संरक्षण मंत्रालयाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, सर्व माध्यम वाहिन्या, डिजिटल प्लॅटफॉर्मंना संरक्षण कारवाया आणि सुरक्षा दलांच्या हालचालींचे थेट प्रक्षेपण किंवा रिअल-टाइम वार्तांकन टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अशा संवेदनशील किंवा स्रोत-आधारित माहितीचे वार्तांकन लष्करी कारवायांना धोका निर्माण करू शकते आणि सैन्याचा जीव धोक्यात आणू शकते.
कारगिलयुद्ध, २६/११चा दहशतवादी हल्ला, कंदहार अपहरण यासारख्या भूतकाळातील घटना अकाली वार्तांकनाचे धोके अधोरेखित करतात, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स (सुधारणा) नियम, २०२१ च्या कलम ६(१)(पी) नुसार, दहशतवादविरोधी कारवायांदरम्यान नियुक्त अधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषदेत माहिती देण्यात येईल. दक्षता, संवेदनशीलता आणि जबाबदारीपूर्वक वार्तांकन करावे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
सरकारने म्हटले की, जर कोणत्याही चॅनेलने केबल टीव्ही नेटवर्क सुधारणा कायदा २०२१ च्या नियमांचे उल्लंघन केले, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. विशेषतः संरक्षण कारवाया किंवा हालचालींशी संबंधित कोणतेही रिअल-टाइम प्रक्षेपण, दृश्यांचा प्रसार करु नये. संवेदनशील माहितीचा अकाली खुलासा अनवधानाने शत्रूंना मदत करू शकतो आणि सुरक्षा दलाची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, असे सरकारने म्हटले आहे.
सर्व टीव्ही वाहिन्यांनी केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स (सुधारणा) नियम, २०२१ च्या नियम ६(१)(पी) चे पालन करावे.
नियम ६(१)(पी) नुसार, सुरक्षा दलांच्या कोणत्याही दहशतवादविरोधी कारवायांचे थेट प्रक्षेपण असलेला कोणताही कार्यक्रम प्रसारित केला जाऊ नये.
संरक्षण दलाच्या कारवाया पूर्ण झाल्यावर त्याची माहिती सरकारी अधिकार देतील.
कायदे आणि मानकांचे पालन करून दक्षतापूर्ण, संवेदनशील आणि जबाबदारीने वृत्तांकन करावे.
कायदेशीर जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त, आपल्या सामूहिक कृतींमुळे सैन्याच्या सुरक्षेला धोका पोहोचणार नाही याची खात्री करणे ही एक नैतिक जबाबदारी आहे.