India Pakistan Conflict
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. यानंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. हा तणाव निवळावा या हेतूने अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली.
ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली. यानंतर पाकिस्तानकडून भारतीय भूभागांवर ड्रोनने सतत हल्ले केले जात आहेत. भारताकडूनही हे सर्व ड्रोन हल्ले परतवले जात आहेत. दरम्यान, मार्को रुबियो यांनी जयशंकर यांना फोन केला, 'भारत आणि पाकिस्तानने संघर्ष कमी करण्याचे मार्ग ओळखावेत', तणाव कमी करण्यासाठी अमेरिका मदतीस तयार आहे, असेही ते म्हणाले.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॅमी ब्रूस म्हणाले की, दोन्ही बाजूंनी तणाव कमी करण्यासाठी आणि गैरसमज टाळण्यासाठी थेट संवाद पुन्हा स्थापित करण्याचे मार्ग ओळखावेत यावर सचिव रुबियो यांनी भर दिला. भविष्यातील वाद टाळण्यासाठी त्यांनी रचनात्मक संवादात अमेरिकेला मदत करण्याची ऑफर दिली आहे.
व्हाईट हाऊसने शुक्रवारी म्हटले होते की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारत आणि पाकिस्तानमधील तणाव "शक्य तितक्या लवकर" कमी करायचा आहे. पत्रकार परिषदेत व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट म्हणाल्या की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीहे स्पष्ट केले आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लवकरात लवकर कमी करायचा आहे.
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी म्हटलं आहे की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दोन्ही देशांच्या नेत्यांशी चांगले संबंध आहेत. दोन्ही देशांच्या नेत्यांशी सतत संपर्कात आहेत. एस जयशंकर यांनी रुबियो यांना सांगितले की, परिस्थिती चिघळवण्याच्या पाकिस्तानच्या कोणत्याही प्रयत्नांना भारत जोरदार प्रत्युत्तर देईल.