लाहोर/नवी दिल्ली : पाकिस्तानमधील रहिम यार खान हवाईतळावर हल्ला करण्यासाठी भारताने ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राचा वापर केला असल्याची शक्यता पाकिस्तानच्या संरक्षण दलातील वरिष्ठ अधिकार्यांनीच व्यक्त केली. हा तळ पंजाब, काश्मीर आणि राजस्थान सीमेवर हल्ला करण्याच्या द़ृष्टीने सामरिकद़ृष्ट्या महत्त्वाचा आहे. दरम्यान, या हवाईतळाच्या धावपट्टीचे मोठे नुकसान झाल्याने 18 मेपर्यंत उड्डाणे बंद करण्यात आली आहेत.
भारताने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील राहिम यार खान एअरबेसवर केलेल्या हल्ल्यानंतर, तळावरील एकमेव धावपट्टीचे मोठे नुकसान झाले आहे. ‘ब्रह्मोस’सारख्या शक्तिशाली क्षेपणास्त्राच्या हल्ल्यानेच असे नुकसान होऊ शकते, अशी शक्यता पाकच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्यांनी व्यक्त केल्याचे वृत्त पाक प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या धावपट्टीवरून एक आठवडा उड्डाण करता येणार नाही, असे पाकिस्तान सिव्हिल एव्हिएशन ऑथॉरिटीने जाहीर केले. शनिवारी (10 मे) पाकिस्तानी वेळेनुसार 4 वाजता (भारतीय वेळेनुसार 4.30 वाजता) ते 18 मे पाकिस्तान वेळेनुसार 4.59 वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार 5.29) ही सूचना लागू राहील, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या धावपट्टीचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने ही बंदी आहे; परंतु अधिक तपशील देण्यात आलेला नाही.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या दक्षिण भागातील या महत्त्वाच्या हवाईतळावर उड्डाणास तात्पुरती बंदी, तसेच बंदीची वेळ आणि कालावधी यामुळे ‘ब्रह्मोस’ने या हवाईतळाच्या धावपट्टीवर थेट हल्ला केला असावा आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असावे, असे संरक्षण क्षेत्रातील अभ्यासकांनी सांगितले.
इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशननुसार, पाकिस्तानी हवाई हद्दीच्या सूचनेवरून ‘डब्ल्यूआयपी’ कोडचा वापर म्हणजे काम सुरू आहे. यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशननुसार, ‘डब्ल्यूआयपी’ म्हणजे विमानतळाच्या पृष्ठभागावर होणारे कोणतेही काम. या सूचनेमध्ये एअरबेसच्या धावपट्टीचा स्पष्ट उल्लेख असल्यामुळे, या कामाचा थेट संबंध धावपट्टीच्या दुरुस्तीशी आहे.