India Most Expensive Number Plate
नवी दिल्ली : नंबर प्लेटसाठी देशातील सर्वात मोठा विक्रम झाला आहे. हरियाणातील 'HR88B8888' या नंबर प्लेटसाठी बुधवारी लिलावात 1.17 कोटी रुपयांची विक्रमी बोली लागली. या बोलीमुळे ही नंबर प्लेट भारतातील सर्वात महागडी कार नोंदणी क्रमांक बनली आहे. हिसारमधील एका तरुण व्यावसायिकाने ही बोली जिंकली आहे.
व्हीआयपी आणि खास सिरीजच्या या नंबर प्लेटसाठी मोठी चुरस पाहायला मिळाली. लिलावाची सुरुवात 50,000 पासून झाली होती, मात्र यात एकूण ४५ जणांनी बोली लावली. दुपारी ही रक्कम 88 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आणि अखेरीस संध्याकाळी ५ वाजता 1 कोटी 17 लाख रुपयांवर थांबली.
हा विक्रमी नंबर प्लेट हिसार येथील सुधीर कुमार (वय ३०) या तरुण व्यावसायिकाने खरेदी केला आहे. सुधीर यांचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे. त्यासोबतच त्यांची एक सॉफ्टवेअर कंपनी असून, सध्या ते व्यावसायिक वाहतुकीसाठी एक मोबाईल ॲपही विकसित करत आहेत. पीटीआयशी बोलताना सुधीर कुमार म्हणाले, “माझे कोणतेही निश्चित बजेट नव्हते. मला हा ‘८८८८’ अंक खूप आवडला, त्यामुळे मी बोली लावण्याचा निर्णय घेतला.” या बोलीची इतकी चर्चा होईल असे वाटले नव्हते, असेही त्यांनी सांगितले.
हा नंबर महाग असण्यामागे अंकांचे विशेष महत्त्व आहे.
नंबर प्लेटमध्ये वारंवार '८' अंकांचा पॅटर्न दिसून येतो.
हा क्रमांक चार वेळा एकसारखा अंक (8888) असल्याने तो अत्यंत शुभ मानला जातो.
याशिवाय, RTO मध्ये 'B' चा आकारही ८ सारखा दिसतो, त्यामुळे अनेकजण या नंबरला पसंती देतात.
व्हीआयपी नंबर प्लेट्सचा लिलाव अधिकृत पोर्टलवर केला जातो. बोली शुक्रवार संध्याकाळ ते सोमवार सकाळपर्यंत खुली असते, तर निकाल बुधवारी संध्याकाळी जाहीर केले जातात. सुधीर कुमार यांना आता ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि संपूर्ण रक्कम जमा करण्यासाठी किमान पाच दिवसांचा अवधी मिळाला आहे.