AK 203 Sher Rifle File Photo
राष्ट्रीय

AK 203 Sher Rifle: भारतीय सैन्याची नवी ताकद! १००% स्वदेशी 'शेर' रायफल तयार; पाहा AK-203 ची खास वैशिष्ट्ये

भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत संरक्षण क्षेत्रात भारताने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.

मोहन कारंडे

AK 203 Sher Rifle

नवी दिल्ली: भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत संरक्षण क्षेत्रात भारताने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी येथील कोरवा दारूगोळा कारखान्यात पूर्णपणे स्वदेशी घटकांनी बनवलेल्या पहिल्या १००% भारतीय ‘AK-203’ असॉल्ट रायफलची निर्मिती करून तिची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. या रायफलचे नाव ‘शेर’ ठेवण्यात आले आहे.

भारत आणि रशिया यांच्या संयुक्त विद्यमाने २०१९ मध्ये स्थापन झालेल्या ‘इंडो-रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने या रायफलची निर्मिती केली आहे. या यशाबाबत IRRPL चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक मेजर जनरल एस. के. शर्मा यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

'शेर' AK-203 रायफलची वैशिष्ट्य काय?

AK-203 ही ७.६२x३९ मिमी कॅलिबरची आधुनिक आणि गॅस-ऑपरेटेड असॉल्ट रायफल आहे. कलाश्निकोव्ह मालिकेची विश्वासार्हता आणि आधुनिक युद्धतंत्राला पूरक अशी रचना हे याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

  • ही रायफल एका मिनिटात ७०० राऊंड्स फायर करू शकते.

  • ८०० मीटर अंतरापर्यंत अचूक मारा करण्याची क्षमता.

  • आधुनिक टेलिस्कोपिक साईट्स आणि अ‍ॅक्सेसरीज जोडण्यासाठी मॉड्युलर रेल्स.

  • भारतीय सैन्यात वर्षानुवर्षे वापरल्या जाणाऱ्या जुन्या ‘इन्सास’ रायफल्सच्या तुलनेत AK-203 अधिक घातक.

  • वजनाने हाताळण्यास सोपी आणि अत्यंत प्रतिकूल हवामानातही प्रभावीपणे काम करते.

  • भारतीय लष्करातील जुन्या इन्सास रायफल्सची जागा आता या स्वदेशी AK-203 रायफल्स घेणार आहेत.

"आम्हा सर्वांसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. १००% भारतीय सुटे भाग आणि कच्च्या मालाचा वापर करून तयार केलेल्या पहिल्या AK-203 (शेर) रायफलची आम्ही यशस्वी चाचणी घेतली आहे. केवळ काही ठराविक भागांचे स्थानिकीकरण न करता, संपूर्ण रायफलची १००% स्वदेशी निर्मिती करण्यात आली आहे. हा खऱ्या अर्थाने 'आत्मनिर्भर भारत'चा जिवंत पुरावा आहे."
— मेजर जनरल एस. के. शर्मा, सीईओ व एमडी, IRRPL

सैन्याला लवकरच सोपवणार; दर १०० सेकंदाला एका रायफलची निर्मिती!

मेजर जनरल शर्मा यांनी सांगितले की, या स्वदेशी रायफलची सिंगल आणि बर्स्ट फायरिंग टेस्ट यशस्वी झाली असून याचे सुरुवातीचे निष्कर्ष अतिशय उत्साहवर्धक आहेत. सप्टेंबर २०२६ पर्यंत लष्कराच्या चाचण्यांसाठी या १००% स्वदेशी बनावटीच्या रायफल्सचे नमुने सोपवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

उत्पादन क्षमतेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, लवकरच IRRPL द्वारे दर १०० सेकंदाला एक AK-203 'शेर' रायफल तयार केली जाईल. तसेच क्षमता वाढ आणि उत्पादन प्रक्रियेतील सुटसुटीतपणामुळे भारतीय लष्कराला पुरवल्या जाणाऱ्या ६ लाख रायफल्सची डिलिव्हरी निर्धारित वेळेच्या तब्बल एक वर्ष आधीच पूर्ण करणे शक्य होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT