नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र संघाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात भारत आणि जगातील इतर अनेक देशांमध्ये कमी होत असलेल्या जन्मदराबाबत चिंता व्यक्त केली आहे. या अहवालानुसार, भारतातील जन्मदर आता प्रति जोडपे केवळ १.९ इतकाच राहिला आहे, जो लोकसंख्येचा रिप्लेसमेंट लेव्हल (२.१) पेक्षा कमी आहे.
एप्रिल महिन्यापर्यंत भारताची लोकसंख्या अंदाजे १४६.३९ कोटींवर पोहोचली आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या लोकसंख्या अहवालात म्हटले आहे. याच अहवालानुसार, देशाचा एकूण प्रजनन दर (TFR) १.९ पर्यंत घसरला आहे, जो २.१ च्या प्रतिस्थापन पातळीपेक्षा कमी आहे. लोकसंख्या शास्त्रज्ञांच्या मते, हा आकडा चिंताजनक असून, जरी याचे तात्काळ परिणाम सध्या दिसत नसले तरी, एका पिढीनंतर म्हणजेच काही दशकांनंतर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. 'जागतिक लोकसंख्या २०२५ ची स्थिती: वास्तविक प्रजनन संकट' या अहवालानुसार, सुमारे ४० वर्षांनी लोकसंख्या कमी होण्यास सुरुवात होण्यापूर्वी ती १७० कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या अहवालात भारताला 'जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश' म्हटले असून, एकेकाळी आघाडीवर असलेल्या चीनची सध्याची लोकसंख्या १४१.६१ कोटी इतकी नमूद करण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या या अहवालात जन्मदर कमी होण्याच्या कारणांचाही शोध घेण्यात आला आहे. यासाठी १४ देशांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. लोकांना विचारण्यात आले की, त्यांना हवी असलेली मुले का नाहीत किंवा त्यांनी कमी मुलांना जन्म का दिला? यावर मिळालेल्या उत्तरांमधून अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत आणि लोकांच्या चिंताही समोर आल्या आहेत.
वंध्यत्व : भारतात १३ टक्के लोकांनी सांगितले की ते वंध्यत्वाच्या समस्येमुळे किंवा गर्भधारणेत अडचणी येत असल्यामुळे मुलांना जन्म देऊ शकले नाहीत.
गर्भधारणेसंबंधी वैद्यकीय समस्या : १४ ट्क्के लोक गर्भधारणेसंबंधी वैद्यकीय समस्यांशी झुंजत आहेत.
आरोग्याच्या समस्या : १५ ट्क्के लोक गंभीर आजारपणामुळे पालक बनू शकले नाहीत.
आर्थिक अडचणी : तब्बल ३८ ट्क्के लोकांनी आर्थिक मर्यादांमुळे कुटुंब वाढवण्यास नकार दिला. त्यांना वाटते की कुटुंब वाढल्यास मुलांचे संगोपन, शिक्षण आणि राहण्याचा खर्च भागवणे कठीण होईल. (विशेष म्हणजे, आर्थिक चिंतांमुळे कुटुंब न वाढवणाऱ्यांची संख्या अमेरिकेतही ३८ टक्के इतकीच आहे.)
निवाऱ्याची समस्या : २२ ट्क्के लोकांना घरांची समस्या भेडसावत आहे.
रोजगाराच्या संधींचा अभाव : २१ ट्क्के लोक रोजगाराच्या संधी कमी असल्यामुळे मुलांना जन्म देऊ इच्छित नाहीत.