Ramdas Athawale
नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनुसार भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला संपूर्ण जगासमोर आणले. 'ऑपरेशन सिंदूर' द्वारे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून अभिनंदन करतो, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
मंत्री रामदास आठवले यांनी राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी 'ऑपरेशन सिंदूर'वर त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरला आपल्या देशाच्या हद्दीत समाविष्ट करण्याची आरपीआयची (आ) मागणी आहे. पाकव्याप्त काश्मीरवरील ताबा हा दहशतवादावरचा एकमेव कायमचा उपाय आहे, आजच्या परिस्थितीत संपूर्ण जग दहशतवादी घटनांनी त्रस्त आहे. दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणारा पाकिस्तान दहशतवादात सर्व बाजूंनी वेढला गेला असल्याचेही ते म्हणाले.
आठवले म्हणाले की, पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे पर्यटकांची निर्घृण हत्या केली त्याविरुद्ध भारतीय सैन्याच्या अदम्य धाडसी कारवाईचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तरामुळे देशवासीयांना अभिमान वाटला आणि संपूर्ण जगाने भारतीय सैन्याच्या शौर्याची कबुली दिली आहे. भारतीय सैन्याच्या शौर्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना युद्धबंदीच्या मुद्द्यावर शरणागती पत्करावी लागली, असेही ते म्हणाले.