नवी दिल्ली : जागतिक तंत्रज्ञान आणि भू-राजकारणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. अमेरिकेने सेमीकंडक्टर पुरवठा साखळी सुरक्षित करण्यासाठी ‘पॅक्स सिलिका’ नावाच्या नऊ देशांच्या एका नव्या आघाडीची घोषणा केली आहे.
मात्र, सेमीकंडक्टर निर्मितीचे जागतिक केंद्र बनण्याचे स्वप्न पाहणार्या आणि त्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करणार्या भारताला या महत्त्वाच्या गटात स्थान देण्यात आलेले नाही. या निर्णयामुळे भारताच्या सेमीकंडक्टर धोरणासमोर नवीन आव्हाने उभी राहिली आहेत. पॅक्स सिलिका ही अमेरिका-प्रणित एक व्यूहात्मक आघाडी आहे. या आघाडीचा मुख्य उद्देश सेमीकंडक्टर निर्मितीसाठी लागणार्या खनिजांपासून ते अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्फ्रास्ट्रक्चरपर्यंत संपूर्ण पुरवठा साखळी चीनसारख्या देशांवरील अवलंबित्व कमी करून सुरक्षित करणे हा आहे.