नवी दिल्ली : एसआयआरला विरोध आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीने रविवारी आयोजित रॅलीवेळी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि 'इंडिया' आघाडीचे इतर नेते एका खुल्या बसमधून जाताना. रॅलीचा सर्व मार्ग कार्यकर्ते, समर्थकांच्या गर्दीने फुलून गेला होता. (पीटीआय फोटो) 
राष्ट्रीय

मतचोरीविरोधात इंडिया आघाडीचे शक्तिप्रदर्शन

INDIA bloc rally against vote theft Gyanesh Kumar | पंतप्रधानांकडून ज्ञानेश कुमारांना वाचवण्याचा प्रयत्न : खर्गे

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

मतचोरीच्या मुद्द्यावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर 'व्होट बचाओ, देश बचाओ' सभेच्या माध्यमातून विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने रविवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीसाठी १९ विरोधी पक्षांसह देशभरातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, पदाधिकारी दिल्लीत दाखल झाले होते.

सभेच्या निमित्ताने 'व्होट बचाओ, देश बचाओ' आणि 'व्होट चोर, गद्दी छोड' अशा घोषणांनी दिल्लीचे रस्ते दुमदुमून गेले. राजकीय कार्यकर्त्यांसोबतच साधू-संत, तरुण, महिला, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती हे या सभेचे वैशिष्ट्य ठरले.

मिंटो रोड ते रामलीला मैदान, नेत्यांचा भव्य मोर्चा

इंडिया आघाडीच्या सभेपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, राजद नेते तेजस्वी यादव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत, भाकपचे नेते डी. राजा, पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती, भाकपचे नेते दीपंकर भट्टाचार्य, माकपचे नेते एम. ए. बेबी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि केरळ काँग्रेसचे नेते व्ही. डी. सतीशन यांच्यासह विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी मिंटो रोड ते रामलीला मैदान असा भव्य मोर्चा काढला. हे सर्व वरिष्ठ नेते खुल्या वाहनांतून सहभागी झाले होते. रस्त्यांच्या दुतर्फा हजारो लोकांनी गर्दी केली होती.

मैदानाबाहेरही गर्दीचा महापूर

रॅलीत सहभागासाठी देशभरातून नागरिक शनिवारी रात्रीपासूनच दिल्लीत दाखल झाले होते. रविवारी सकाळपर्यंत रामलीला मैदानासह परिसरातील रस्ते, चौक व उड्डाणपूल गर्दीन भरून गेले. मैदानापासून अनेक किलोमीटरपर्यंत जनसमुदाय दिसत होता. हातात तिरंगा, बॅनर व पोस्टर घेऊन आंदोलक 'व्होट चोर, गद्दी छोड'च्या घोषणा देत मैदानाकडे मार्गक्रमण करत होते. कर्नाटकातील आंदोलकांनी मतदार यादीतून नावे वगळल्याचा दावा असलेल्या मतदारांची नावे लिहिलेला अनेक मीटर लांबीचा कापडी बॅनर आणला होता.

ज्ञानेश कुमार जाणारच; राहुल गांधींसह विरोधकांचा एल्गार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठेही जाऊ शकत नाहीत. त्यांना जायचे असेल, तरी आम्ही त्यांना जाऊ देणार नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी मतांची चोरी केली आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांच्यानंतर विरोधक त्यांच्या विरोधात उभे राहतील आणि त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी (दि. १) दिला. देशाची संपत्ती अदानींच्या घशात घालणे आणि मतांची चोरी करणे, याचा जाब देश त्यांना विचारेल, असेही ते म्हणाले. तर ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी होणार नाहीत. ज्ञानेश कुमार लपले, तरी इंडिया आघाडी त्यांना शोधून काढेल, असा इशारा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिला.

मतचोरी आणि निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता यांविरोधात रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीने 'व्होट बचाओ, देश बचाओ' महारॅलीचे आयोजन केले होते. या सभेला लाखोंची गर्दी झाल्याचा दावा आयोजकांनी केला. २० विरोधी पक्षांचे प्रमुख नेते या वेळी एकाच मंचावर आले होते. मिंटो रोड येथून रामलीला मैदानापर्यंत रॅली काढण्यात आली. गर्दीमुळे मोर्चा मैदानापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे तीन तास लागले.

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात मतदार याद्या, ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसह पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांत मतांची चोरी झाल्याचा आरोप त्यांनी केला, एसआयआर प्रक्रियेचा संदर्भ देत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर मतदार यादीतून १३ कोटींहून अधिक नावे वगळल्याचे ते म्हणाले. प्रत्येक सातमागे एका मतदाराचे नाव वगळल्याचे सांगत त्यांनी लोकसभा निवडणुकीतील इंडिया आघाडी व एनडीए यांच्या मतांच्या फरकाच्या तुलनेत ही संख्या मोठी असल्याचे सांगितले. त्यामुळे २०२४ ची लोकसभा निवडणूक बेकायदेशीर असल्याचा आरोपही त्यांनी केला.

माझा आवाज हा एका पक्षाचा नव्हे तर जनतेचा आहे. देशाची लोकशाही व संविधान उद्ध्वस्त होऊ देणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले. रा. स्व. संघ संस्थांवर ताबा मिळवत असल्याचा आरोप करताना त्यांनी शेतकरी, युवक व कामगारांच्या प्रश्नांकडेही लक्ष वेधले. देशातील संपत्ती अदानी अंबानी यांच्याकडे केंद्रित होत असल्याची टीका त्यांनी केली

मोदी मतदार निवडतात : खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे यांनीही निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपले 'चेले' ज्ञानेश कुमार यांना मुख्य निवडणूक आयुक्त करून मतदारांची नावे वगळली, असा आरोप त्यांनी केला. मोदी मतदार निवडतात, जनता त्यांना निवडत नाही, अशी टीका करत खर्गे यांनी भाजपची राज्यांतील सरकारे मतचोरीच्या जोरावर टिकून असल्याचा आरोप केला. लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी हा संघर्ष असल्याचे सांगत, मोदी सत्तेतून गेल्यावरच लोकशाही सुरक्षित राहील, असे ते म्हणाले.

रामलीला मैदान गर्दीने तुडुंब!

इंडिया आघाडीच्या सभेसाठी देशभरातून लोक आले होते. काँग्रेससह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांचाही यात समावेश होता. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा व दिल्ली या चार राज्यांतील लोक अधिक होते. रामलीला मैदान तसेच मिंटो रोड परिसर लोकांनी भरून गेला होता. रॅली व सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त केला होता. दिल्ली पोलिसांसह सीआरपीएफ, सीआयएसएफ, दंगल नियंत्रण पथकांसह विविध विशेष पथके तैनात केली गेली होती.

सांस्कृतिक विविधतेतून निषेधाची अभिव्यक्ती

हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश व राजस्थानातील नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. लोकगीतांच्या तालावर नृत्य, ढोल-नगारे, पारंपरिक वाद्ये आणि डफलीच्या माध्यमातून लोक निषेध व्यक्त करत होते. निवडणुकीतील कथित अनियमिततांवर भाष्य करणारी पथनाट्ये आणि व्यंगचित्रांचे बॅनरही कलाकारांनी सादर केले. रामलीला मैदानापासून जवळपास तीन किलोमीटरपर्यंत ढोल-नगाऱ्यांच्या गजरात आंदोलनाचा उत्सवी माहोल अनुभवायला मिळाला. राहुल गांधी यांनी या रॅलीचे वर्णन 'शिव की बारात' असे केले. सर्वजण या बारातीत सहभागी झाल्याचे त्यांनी म्हटले.

महाराष्ट्रातील नेत्यांना भाषणाची संधी नाही

सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी आर्दीनी भाषणे केली. मात्र महाराष्ट्रातून उपस्थित कोणालाही भाषणाची संधी नव्हती

माघार घेणार नाही : ममता

प. बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही एसआयआरवर टीका केली. आम्ही माघार घेणार नाही. लोकशाहीच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावू, दिल्लीत लोकशाहीची लूट होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला

'भाजपला आयोगाची मदत'

सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मतदार याद्यांमधून १ कोटी २७ लाख नावे वगळल्याचा आरोप करत निवडणूक आयोग भाजपला मदत करत असल्याचा दावा केला. लोकशाहीची ही हल्दीघाटी आहे, असे ते म्हणाले. तेजस्वी यादव यांनी मतदार आणि मतचोर यांच्यातील लढाई असल्याचे सांगत महाभारतातील दाखल्यातून सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT