नवी दिल्ली : विरोधकांची इंडिया आघाडी आज (सोमवारी) संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढणार आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीतील वरिष्ठ नेते या मोर्चामध्ये सहभागी होतील. इंडिया आघाडीचे सर्व खासदारही या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचे समजते. म्हणजे राहुल गांधीच्या मोर्चाचे नेतृत्व करणार असल्याचेही समजते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून राहुल गांधी सातत्याने निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप करत आहेत. त्यानंतर काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी एक विशेष पत्रकार परिषदेत घेतली. या पत्रकार परिषदेत एका सादरीकरणाद्वारे निवडणूक आयोगाने कशा पद्धतीने मतचोरी केली, हे सांगितले. याच अनुषंगाने १ बैठक त्यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावली होती. या बैठकीलाही इंडिया आघाडीतील दिग्गज नेते समोर होते. सर्वप्रथम काँग्रेस पक्षामध्ये, त्यानंतर इंडिया आघाडीमध्ये आणि आता लोकांमध्ये मतचोरीबद्दल विरोध करण्यावर राहुल गांधी भर देत आहेत.
सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे सर्व खासदार देखील दिल्लीत आहेत. या दरम्यान सोमवारी हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून पुन्हा एकदा देशभराचे लक्ष मतचोरी या प्रकाराकडे वेधण्याचा राहुल गांधी प्रयत्न करतील. या मोर्चाच्या प्रसंगी इंडिया आघाडीतील ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, शरद पवार, अखिलेश यादव, संजय राऊत, कनिमोझी, मनोज कुमार झा आदी नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते.