File Photo
राष्ट्रीय

INDIA alliance meeting Delhi : केंद्र सरकारविरोधात 'इंडिया' आघाडीचे सोमवारी शक्तीप्रदर्शन

INDIA alliance meeting Delhi : पश्चिम बंगालमधील घडामोडींनंतर बैठकीला महत्त्व

पुढारी वृत्तसेवा

INDIA alliance meeting Delhi

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीची महत्त्वाची बैठक (सोमवारी) आज होणार आहे. या बैठकीत २३ राजकीय पक्ष सहभागी होणार असल्याचे समजते. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, संविधान आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात संयुक्त रणनीती आखण्यावर या बैठकीचा भर असणार आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्या घडामोडी घडत आहेत, त्या पार्श्वभूमीवर देखील ही बैठक महत्त्वाची मानली जाते.

राजधानी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्‍ये होणार बैठक

राजधानी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे दुपारी १२ वाजता ही बैठक होणार असून यामध्ये आगामी संसदीय अधिवेशन, देशातील राजकीय परिस्थिती तसेच जनतेशी संबंधित प्रश्नांवर चर्चा होणार आहे. काही पक्ष बैठकीला उपस्थित राहू शकणार नसले तरी त्यांनी आघाडीच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सांगितले.

बैठकीत देशासमोरील प्रमुख समस्‍यांवर होणार चर्चा

केंद्र सरकारच्या धोरणांमुळे लोकशाही संस्था आणि संवैधानिक मूल्यांवर परिणाम होत असल्याचा आरोप करत रमेश यांनी महागाई आणि बेरोजगारी हे देशासमोरील गंभीर प्रश्न असल्याचे म्हटले. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले असून तरुणांसाठी रोजगाराच्या संधी कमी झाल्याचा मुद्दा बैठकीत ठळकपणे मांडला जाणार आहे.या बैठकीत केंद्र सरकारविरोधातील पुढील राजकीय कार्यक्रम, संसदेत आणि जनआंदोलनांमधील समन्वय तसेच विरोधकांची एकजूट अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 'इंडिया' आघाडीच्या भविष्यातील राजकारणाच्या दृष्टीने या बैठकीकडे विशेष लक्ष लागले आहे.

बंगालमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बैठक

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला. विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. विशेष म्हणजे ममता बॅनर्जी या बैठकीला उपस्थित असणार आहेत. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि इतर विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर या बैठकीला द्रमुकचे नेते उपस्थित राहतात का, हे पाहणे महत्त्वाचे असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT