ias padma jaiswal dismissed : केंद्र सरकारने भ्रष्टाचाराच्या आरोप झालेल्या एका आएएस अधिकारी पद्मा जायसवाल यांच्याविरूद्ध कठोर कारवाई केली आहे. २००३ च्या बॅचच्या एजीएमयूटी कॅडरच्या वरिष्ठ आयआएस अधिकारी पद्मा जायसवाल यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.
अधिकृत माहितीनुसार हा बडतर्फीचा आदेश कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या (DOPT) शिफारसीनंतर भारताच्या राष्ट्रपतींच्या अंतिम मंजूरीनंतर जारी करण्यात आला आहे. DOPT हा विभाग थेट पंतप्रधानांच्या अधीन येतो. तसेच AGMUT कॅडरच्या अधिकाऱ्यांच्या प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींच्या आधारे निर्णय घेतला जातो.
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या रिपोर्टनुसार, पद्मा जायसवाल यांनी अशी कोणतीही घटना किंवा बडतर्फीचा आदेश पास झाल्याची माहिती नसल्याचं सांगितलं.
हे प्रकरण १८ वर्षे जुने आहे. २००७-०८ मध्ये पद्मा जायसवाल या अरूणाचल प्रदेशच्या फश्चिम कामेंग जिल्ह्यात उपायुक्त पदावर नियुक्त होत्या. फेब्रुवारी २००८ मध्ये स्थानिक नागरिकांनी दाखल केलेल्या एका तक्रारीमध्ये पद्मा यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत सरकारी पैसे हडपल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपानंतर त्यांना २००८ मध्ये निलंबित करण्यात आले होते. २०१० मध्ये त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले होते.
पद्मा जायसवाल यांनी आपल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळ प्रशासकीय सेवा बजावली आहे. त्यांनी अरूणाचल प्रदेश, दिल्ली, गोवा आणि पुडुचेरी इथं अनेक महत्वाची पदे भूषवली आहेत. त्यांनी सेंट झेव्हियर्स स्कूलमधून शिक्षण घेतलं असून त्यानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठाच्या युनिव्हरसिटी बिजनेस स्कूलमधून शिक्षण घेतलं. त्यांच्याकडे एमबीएची पदवी असून त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) चे कंपनी सेक्रेटरीचा सर्टिफिकेशन कोर्स देखील केला आहे.
त्यांनी युजीसी रिसर्च फेलो म्हणून देखील काम केलं आहे. त्यांचा शैक्षणिक कल हा विजनेस एडमिनिस्ट्रेशन, मॅनेजमेंट, इंटरनॅशनल अफेअर्स, फायनान्स मॅनेजमेंट आणि लीगल पर्सनल मॅनेजमेंट याच्याकडे होता.