PM Narendra Modi  (Source- DD News)
राष्ट्रीय

PM Modi : शेतकऱ्यांच्या हितासाठी भारत मोठी किंमत मोजण्यास तयार, ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींचे वक्तव्य

पीएम मोदी यांनी दिल्लीतील एमएस स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेत संबोधित केले

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टॅरिफ (Trump tariff India) लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी भारत मोठी किंमत मोजण्यास तयार असल्याचे पीएम मोदी यांनी गुरुवारी म्हटले. त्यांनी आज दिल्लीतील एमएस स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेत संबोधित केले.

"आमच्यासाठी, आमच्या शेतकऱ्यांचे हित हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भारत आपले शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार बंधू-भगिनींच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही. मला माहित आहे की याची आम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि आम्ही त्यासाठी तयार आहोत. आज, भारत माझ्या देशातील मच्छिमारांसाठी, माझ्या देशातील पशुपालकांच्या कल्याणासाठी आम्ही तयार आहोत," असे पीएम मोदी म्हणाले.

ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदी यांनी हे वक्तव्य केले आहे. अमेरिकेच्या टॅरिफमुळे व्यापारात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ज्याचा परिणाम अनेक क्षेत्रांवर होऊ शकतो.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शेतीवरील खर्च कमी करणे आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्याच्या उद्दिष्टांवर आम्ही सतत काम करत आहोत. सरकारने शेतकरी ताकदीला देशाच्या प्रगतीचा एक आधार मानले आहे. यामुळेच गेल्या काही वर्षांत जी धोरणे तयार करण्यात आली ती केवळ मदत नव्हती, तर शेतकऱ्यांचा विश्वास वाढवण्याचा आमचा प्रयत्न होता. पीएम किसान सन्मान निधीद्वारे मिळत असलेल्या थेट मदतीमुळे छोट्या शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. पीएम पीक विमा योजनेने शेतकऱ्यांना जोखमींपासून सुरक्षा प्रदान केली आहे. पीएम कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून सिंचनाशी संबंधित समस्या सोडवल्या आहेत. १० हजार एफपीओच्या निर्मितीमुळे छोट्या शेतकऱ्यांची संघटित शक्ती वाढली आहे. सहकारी आणि बचत गटांना आर्थिक मदत मिळाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवीन गती मिळाली आहे. ई-नाममुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेत उत्पादनाची विक्री करणे सोपे झाले आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.

'स्वामीनाथन यांनी शेतकऱ्यांना शेतीच्या पद्धतीत बदल करण्यासाठी प्रेरित केले'

डॉ. स्वामीनाथन यांनी भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी अभियन राबवले. शेतीमध्ये केमिकला वाढता वापर आणि मोनो-कल्चर फार्मिंगच्या धोक्यांबद्दल ते शेतकऱ्यांना सतत जागरूक करत राहिले. ते केवळ संशोधन करत नव्हते तर त्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या पद्धतीत बदल करण्यासाठी प्रेरित केले. आजही त्यांचा दृष्टिकोन आणि विचार भारताच्या कृषी क्षेत्रात सगळीकडे दिसून येतो. ते खरोखरच भारतमातेचे रत्न होते, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT