Honey Singh Nephew Accident:
जालंधर : मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीवरून घरी परतत असताना झालेल्या भीषण अपघातात पंजाबी गायक यो यो हनी सिंगच्या पुतण्यासह दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी पहाटे पंजाबमधील जालंधर येथील पोलीस लाईन उड्डाणपुलावर ही घटना घडली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी विदीत ओलक हा प्रसिद्ध पंजाबी गायक 'यो यो हनी सिंग'चा पुतण्या असून, 'स्पीड रेकॉर्ड्स' या नामांकित पंजाबी संगीत कंपनीचे मालक दिनेश यांचा मुलगा होता. तर दुसरा मृत तरुण आरव तलवार हा प्रसिद्ध 'पप्पी स्विट्स'च्या मालकाचा मुलगा होता. या घटनेनंतर हनी सिंगने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दुःख व्यक्त केले आहे.
बारादरी पोलीस ठाण्याचे एसएचओ साहिल चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास पोलिसांना अपघाताची माहिती मिळाली. पोलीस लाईन परिसरातील उड्डाणपुलावर महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी काम करत होते. कचरा गोळा करण्यासाठी त्यांनी ट्रॅक्टर-ट्रॉली रस्त्याच्या कडेला उभी केली होती.
दरम्यान, बीएमसी चौकाकडून बीएसएफ चौकाच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या फॉक्सवॅगन कारने उभ्या असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारमधील विदीत ओलक आणि आरव तलवार या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अपघातापूर्वी कारमध्ये एकूण पाच मित्र प्रवास करत होते. मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आटोपून ते घरी परतत होते. मात्र, अपघात होण्यापूर्वीच अन्य तीन मित्र आपापल्या घरी उतरले होते. त्यानंतर काही वेळातच उर्वरित दोघांचा अपघातात मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही तरुणांचे मृतदेह कारमधून बाहेर काढण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.