High Court Ruling on Homemaker's Contribution : गृहिणींचे कुटुंबातील महत्त्वपूर्ण आणि अमूल्य योगदान विचारात घेऊन राजस्थान उच्च न्यायालयाच्या डॉ. न्यायमूर्ती नुपूर भाटी यांच्या खंडपीठाने मोटर अपघात दावा न्यायाधिकरणाने (Motor Accidents Claims Tribunal) दिलेल्या नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ केली. एका गृहिणीच्या अपघाती मृत्यूसंबंधीच्या प्रकरणी उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचाही दाखला दिला.
न्यायालय न्यायाधिकरणाने निश्चित केलेल्या नुकसानभरपाईच्या रकमेविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत होते. याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला की, गृहिणीच्या काल्पनिक उत्पन्नाचे (notional income) अवमूल्यन केले जाऊ शकत नाही. प्रतिवादीने असा युक्तिवाद केला की मृत व्यक्ती गृहिणी असल्यामुळे त्या कमवत नव्हत्या आणि त्यामुळे त्यांचे मासिक उत्पन्न ३,००० रुपये इतके निश्चित करणे हे खरे तर अधिक आहे. गृहिणींच्या योगदानाची तुलना प्रत्यक्ष नोकरीतील उत्पन्नाशी करता येणार नाही, असा युक्तिवाद प्रतिवादीतर्फे करण्यात आला.
दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकालांमध्ये गृहिणींचे महत्त्वपूर्ण आणि अमूल्य योगदान सातत्याने मान्य केले आहे.मोटर अपघात आणि तत्सम दाव्यांमध्ये नुकसानभरपाई देताना गृहिणींच्या सेवांना आर्थिक मूल्य दिलेच पाहिजे. या पार्श्वभूमीवर, न्यायालयाने हे अधोरेखित केले की, ३,००० रुपयांऐवजी, त्या वेळी कुशल मजुरांसाठी असलेल्या किमान वेतनानुसार मृत गृहिणीचे अपेक्षित उत्पन्न ४,६५० रुपये इतके होते. त्यानुसार, न्यायालयाने न्यायाधिकरणाचा आदेश सुधारित केला आणि नुकसानभरपाईच्या मंजूर रकमेत सुमारे ३.१५ लाख रुपयांची वाढ केली.