Crime News
उत्तर प्रदेश: पत्नीने सकाळी झोपेतून लवकर उठवल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादानंतर एका ३५ वर्षीय शेतकऱ्याने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले. उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील रामपूर जट्टारी गावात बुधवारी सकाळी ही घटना घडली. लालू सिंग असे जीवन संपवलेल्या शेतकऱ्याचे नाव असून, त्याने हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी मेव्हण्याला फोन करून ‘हे आपले शेवटचे बोलणे आहे’ असे म्हटले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लालू सिंग याला दररोज सकाळी साधारण ८ वाजता उठण्याची सवय होती. बुधवारी सकाळी ५ च्या सुमारास त्याची पत्नी आशा देवी मुलाला शाळेत पाठवण्यासाठी स्वयंपाकघरात तयारी करत होती. दरम्यान, स्वयंपाकघराच्या दरवाजाचे कुलूप उघडण्यासाठी तिने लालू याला लवकर उठवले. याच कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि रागाच्या भरात लालूने पत्नीला मारहाणही केली.
या वादानंतर पत्नीने मुलाला शाळेत पाठवले आणि लालूसाठी चहा बनवला. सकाळी ७ च्या सुमारास चहा प्यायल्यानंतर लालूने आपल्या मेव्हण्याला फोन केला. फोनवर बोलताना, "हे आपले शेवटचे बोलणे आहे, मी आता जात आहे. माझ्या पाठीमागे तुझ्या बहिणीची काळजी घे," असे तो म्हणाला.
मेव्हण्याशी बोलणे झाल्यानंतर लालूने स्वतःला खोलीत कोंडून घेतले. काही वेळातच खोलीतून गोळी झाडल्याचा आवाज आला. पत्नीने आरडाओरडा केल्यावर शेजारी धावून आले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, लालू खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याच्या मृतदेहाजवळ एक देशी कट्टा सापडला.
लालू सिंगच्या पश्चात पत्नी आशा देवी, सहा वर्षांचा मुलगा आरव आणि एक वर्षाची मुलगी आरोही असा परिवार आहे. या घटनेबाबत माहिती देताना सिकंदराराव पोलीस ठाण्याचे प्रभारी शिवकुमार यांनी सांगितले की, "गुन्ह्यात वापरलेले बेकायदेशीर हत्यार जप्त करण्यात आले आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत."