राष्ट्रीय

हत्‍या प्रकरणी डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याच्‍यासह चौघांची निर्दोष मुक्तता

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हरियाणातील बहुचर्चित रणजित सिंह हत्या प्रकरणात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने स्‍वयंघोषित आध्‍यात्‍मिक व डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह याच्‍यासह अन्‍य चौघांची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्‍वेषण विभागाने (सीबीआय) राम रहीमला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात त्‍याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.. दरम्‍यान,साध्वी लैंगिक शोषण प्रकरणी राम रहीम सिंगला 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सध्या राम रहीम रोहतकच्या सुनारिया कारागृहात आहे.

कोण होते रणजित सिंग?

रणजित सिंग हे हरियाणातील मुळचे कुरुक्षेत्रचे. ते सिरसा डेरा सच्चा सौदाचे व्‍यवस्‍थापक होते. त्यांची १० जुलै २००२ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. एका निनावी साध्वीने तत्‍कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना पत्र लिहिले होते. या पत्रात राम रहीमच्या चौकशीची मागणी केली होती. हे निनावी पत्र लिहायला रणजित सिंग यांनीच भाग पाडल्‍याचा संशय डेरा व्यवस्थापनाला होता. हे निनावी पत्र सिरसा येथील पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी त्यांच्या 'पुरा सच' या सांयदैनिकात प्रकाशित केले. यानंतर 24 ऑक्टोबर 2002 रोजी पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्यावरही गोळ्या झाडण्‍यात आल्‍या. ते गंभीर जखमी झाले. 21 नोव्हेंबर 2002 रोजी दिल्‍लीतील अपोलो हॉस्पिटलमध्‍ये उपचार सुरु असताना त्‍यांचाही मृत्‍यू झाला होता.

सीबीआय न्‍यायालयाने सुनावली होती जन्‍मठेपेची शिक्षा

हत्‍या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे साेपविण्‍यात यावा, अशी मागणी करणारी याचिका रणजीत सिंग यांचा मुलगा जगसीर सिंग याने जानेवारी २००३ मध्ये हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाच्‍या आदेशानुसार तपास सीबीआयकडे सोपविण्‍यात आला. या प्रकरणाचा तपास करत असताना सीबीआयने राम रहीम याच्‍यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला. 2007 मध्ये न्यायालयाने हत्‍या प्रकरणातील आरोपींवर आरोप निश्चित केले. २००३ मध्ये सीबीआयकडे तपास सोपवण्यात आल्यानंतर २००६ मध्ये राम रहीमचा ड्रायव्हर खट्टा सिंग याच्या जबाबाच्‍या आधारे या हत्या प्रकरणात डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह याचे  नाव समोर आलं. 2021 मध्ये सीबीआय कोर्टाने गुरमीत राम रहीमसह पाच  दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT