Thar Bullet DGP statement file photo
राष्ट्रीय

Thar Bullet DGP statement: थार आणि बुलेट चालवणारे लोक गुंड प्रवृत्तीचे! पोलीस महासंचालक अस का म्हणाले?

तुमच्याकडे 'थार' किंवा 'बुलेट' आहे? तर ही बातमी वाचाच! DGP ओपी सिंह यांनी या वाहनांच्या चालकांबद्दल एक खळबळजनक विधान केले आहे.

मोहन कारंडे

Thar Bullet DGP statement

चंडीगढ : हरियाणाचे नवनियुक्त पोलीस महासंचालक ओ.पी. सिंह यांनी आपल्या परखड विधानांमुळे सध्या चर्चेत आहेत. ज्या व्यक्तींकडे महिंद्रा थार असते, ते गुंड प्रवृत्तीचे असण्याची शक्यता आहे. तसेच, थार आणि बुलेट ही वाहने वापरणाऱ्यांमध्ये स्टंटबाजी करण्याची प्रवृत्ती अधिक असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे. शनिवारी पत्रकारांशी बोलताना डीजीपी सिंह यांनी हे मत व्यक्त केले. "वाहन तपासणी करताना पोलिसांनी नागरिकांशी नम्रपणे वागावे, पण थार दिसल्यास तिला थांबवणे गरजेचे आहे," असे ते हसून म्हणाले.

डीजीपी सिंह म्हणाले, "आम्ही प्रत्येक वाहनाची तपासणी करत नाही. पण जर थार किंवा बुलेट असेल, तर आम्ही तिला कशी सोडू? कारण सर्व गुन्हेगार अशा गाड्या आणि बाईक्स वापरतात. वाहनाची निवड तुमची मानसिकता दर्शवते. थार चालवणारे लोक रस्त्यावर स्टंट करतात."

सिंह यांनी थार आणि बुलेट मोटरसायकल चालवणाऱ्या लोकांना सरसकट गुंड प्रवृत्तीचे ठरवले आहे. वाहनांच्या निवडीचा संबंध थेट त्यांच्या मानसिकतेशी जोडल्याने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका एसीपीच्या मुलाने आपल्या थारने एका व्यक्तीला चिरडल्याची घटनाही त्यांनी उदाहरण म्हणून सांगितली. "एसीपींना त्यांच्या मुलाला वाचवायचे होते. चौकशीत थार मुलाच्या नावावर असल्याचे आढळले. अशा लोकांची गणना उपद्रवी घटकांत होते," असे त्यांनी नमूद केले.

पोलीस कर्मचाऱ्यांनाही इशारा

सिंह यांनी आपल्या पोलीस सहकाऱ्यांकडे पाहता उपरोधिकपणे प्रश्न केला, "जर आम्ही पोलिसांची यादी बनवली, तर किती लोकांकडे थार असेल? आणि ज्याच्याकडे ती असेल, तो वेडा असणार. तुम्ही गुंडगिरी करायची आणि नंतर कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याची अपेक्षा करायची, हे चालणार नाही.

'थार' म्हणजे 'स्टेटस सिम्बॉल'

थार गाडीतील लोकांकडून उपद्रव, स्टंटबाजी आणि निष्काळजीपणे गाडी चालवण्याचे प्रकार वाढल्याच्या अनेक घटना अलीकडे समोर आल्या आहेत. थारने स्टंट केल्यामुळे अपघात घडणे किंवा थारवर चढून रील्स बनवण्याचे प्रकार वारंवार दिसत आहेत. डीजीपी म्हणाले, "आता अशा बेजबाबदार लोकांवर लगाम घालण्याची वेळ आली आहे. लोकांना वाटत की थार असल्याने ते रस्त्यावर काहीही करू शकतात."

डीजीपींच्या मते, सध्याच्या तरुणाईमध्ये आणि काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये बुलेट आणि थार हे 'स्टेटस सिम्बॉल' बनले आहेत. कोणालाही लक्ष्य करणे हा आपला उद्देश नसून, लोकांनी रस्त्यावर जबाबदारीने वाहन चालवावे, याबद्दल जागरूकता निर्माण करणे हे आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT