Haryana Rohtak Crime News
हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. येथील महमच्या अजायब गावात दोन महिन्यांच्या बाळाचा ड्रममध्ये बुडून मृत्यू झाला. या बाळाला ड्रममधील पाण्यात बुडवून संपवणारी दुसरी तिसरी कोणी नसून त्याची जन्मदात्री आईच असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेने खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, झारखंडची रहिवासी असलेल्या प्रियंका हिने सुमारे दीड वर्षांपूर्वी अजायब येथील रहिवासी अमितशी लग्न केले होते. प्रियंकाने झारखंडमधील तिच्या माहेरी जाण्याचा आग्रह धरला. अमितने तिला काही दिवस जाऊ नको, असे सांगितले. नवरा माहेरी पाठवून देत नसल्याच्या रागात तिने पोटच्या मुलाला पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून मारले. त्यानंतर तिने डास मारण्याचे औषध पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी केली असता, तिने पोलिसांच्या कारवाईतून स्वतःचा बचाव करण्यासाठी वेगळाच बनावही रचला.
२७ मे रोजी अजायब गावात पाण्याच्या ड्रममध्ये बुडून दोन महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बाळाची आई प्रियंकाची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
प्रियंकाने पोलिसांसमोर वेगळीच कहानी रचून सांगितली. तिने एका महिलेने जादूटोणा केल्याचेही पोलिसांना सांगितले. एक महिला तोंडावर कापड बांधून तिच्या घरात घुसली. तिला धक्का देऊन तिने तिच्या मुलाला ड्रममध्ये बुडवले, असा बनाव प्रियंकाने सुरुवातीला रचला होता. पण तिला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर, पोलिस चौकशीत असे आढळून आले की प्रियंकाने स्वतःच हे कृत्य केले आहे.
याबाबत महम पोलिस स्थानकाचे प्रभारी सुभाष सिंह यांनी सांगितले की, दोन महिन्यांच्या मुलाची तिच्या आईने पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून हत्या केली. त्यानंतर आईने जीवन संपवण्यासाठी ऑलआउट प्राशन केले.
प्रियंकाचे माहेर झारखंडमध्ये आहे. तिच्या नवऱ्याने तिला झारखंडला जाऊ दिले नाही. तेव्हा तिने रागाच्या भरात तिच्या मुलाची हत्या केल्याचे कारण पुढे आले आहे. तिला आज शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले.