जळगाव: शालेय मुलीवर पाच वर्षे अत्याचार; त्यानंतर जबरदस्तीने लावला विवाह
अमळनेर (जळगाव) : शाळेतील ओळखीतून एका अल्पवयीन मुलीवर पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार करून, तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्तीने लग्न लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात रविवार (दि.25) रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या माहितीवरून, पीडित मुलगी ही मूळची गुजरातमधील सुरत येथील रहिवासी असून, ती गेल्या पाच वर्षांपासून पारोळा तालुक्यातील नातेवाईकांकडे राहत होती. अंमळनेर येथील एका शाळेत ती शिक्षण घेत होती. शाळेचे स्नेहसंमेलनामध्ये संशयी आरोपी जितेंद्र अनिल सदानशिव (रा. फरशी रोड अमळनेर) याच्याशी ओळख निर्माण झाली. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन आरोपीने 2020 पासून पीडित मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलीने पुढे संबंध ठेवण्यास नकार देताच त्याने सोबत असलेले आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच तिच्यासोबत पुणे येथे जाऊन बळजबरी विवाह कार्यालयात लग्न लावून शारीरिक व मानसिक त्रास दिला. दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर पीडित मुलीने अखेर पोलिसांना तक्रार दिली. त्यानुसार अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी जितेंद्र अनिल सदानशिव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.

