India Lock down Rumours pudhari
राष्ट्रीय

India Lock down Rumours: देशात कोरोना सारखा लॉकडाऊन लागणार... 'धोकादायक' म्हणत केंद्र सरकारनं काय सांगितलं?

Anirudha Sankpal

India Lock down Rumours: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहाला संबोधित करत जगभारत सुरू असलेल्या तेल संकटाविषयी माहिती दिली. इराण - इस्त्रायल आणि अमेरिका युद्धामुळं तेल आणि गॅस वाहतुकीवर परिणाम झाला असून त्याचे पडसाद भारतात देखील पडत आहेत असं सांगत यासाठी आपल्याला एकजुटीनं कोरोनामध्ये लढलो तसे लढायला लागेल असं वक्तव्य केलं होतं.

या वक्तव्यानंतर देशभरात सोशल मीडियावर भारतात आता पुन्हा लॉकडाऊन लागणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यातच देशातील पेट्रोल आणि गॅस स्टेशनवर लोकांच्या रांगाच रांगा लागल्या. जरी सरकार पेट्रोल टंचाई नाही असं सांगत असलं तरी पेट्रोल पंपांवर मर्यादित पेट्रोल मिळत आहे. अशा परिस्थितीत देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार अशी चर्चा सुरू झाली.

काय म्हणाले हरदीपसिंग पूरी?

यावर आज केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंग पूरी यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी देशात कोणताही लॉकडाऊन लागणार नाहीये. कोरोना सारखी कोणती परिस्थिती नाहीये असं स्पष्ट केलं. त्यांनी लॉकडाऊनची अफवा पसरवणाऱ्यांवर टीका देखील केली. त्यांनी अशा परिस्थितीत अशी अफवा पसरवणे बेजबादार आणि धोकादायक असल्याचं म्हटलं आहे.

पूरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, 'लॉकडाऊनची अफवा पूर्णपणे खोटी आहे. मी स्पष्टपणे सांगतो की केंद्र सरकारच्या विचारात असा कोणताही प्रस्ताव वाहीये. या कठीण काळात आपण शांत राहणं, जबाबदार आणि एकत्र राहणं गरजेचं आहे. अफवा पसरवणे आणि पॅनिक तयार करणे हे बेजबाबदार आणि धोकादायक आहे.'

सरकार आर्थिक भार सहन करणार

दरम्यान, हरदीपसिंग पूरी यांनी देशातील ऊर्जा संकटाबाबत देखील देशाची परिस्थिती सर्वांसमोर ठेवली. ते म्हणाले, 'सध्या जागतिक परिस्थिती अस्थीर आहे. आम्ही ऊर्जा क्षेत्र, पुरवठा आणि जीवनावश्यक वस्तूंबाबतच्या घडामोडींवर रिअल टाईम लक्ष ठेवून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या नागरिकांना तेल, ऊर्जा साधने आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठा होत रहावा यासाठी योग्य ती पावले उचलत आहोत. आम्ही ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. आम्ही या अनिश्चिततेच्या काळात समयसुचकतेनं, शिताफीनं आणि समन्वयानं वागत आहोत.'

हरदीपसिंग पूरी यांनी सरकार जागतिक ऊर्जा संकटात स्वतःचे उत्पन्न पणाला लावून भारतीय नागरिकांच्या हिताचे रक्षण करणार आहे. पूरींनी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती या गेल्या एक महिन्यात ७० डॉलर प्रती बॅरलवरून १२२ डॉलर प्रती बॅरल पोहचल्याचं सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT