Handwritten Letter Working Mother Godrej HR: कंपनीत काम करताना अनेकदा ई-मेल येतात, पुरस्कार मिळतात, कौतुक होतं. पण कधी कधी एखादं साधं, मनापासून लिहिलेलं पत्र सगळ्यांपेक्षा जास्त भावतं. अशीच एक घटना समोर आली आहे. मेघा गोयल, या गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड कंपनीत HR आहेत. त्यांना एका कर्मचाऱ्याच्या 15 वर्षांच्या मुलीकडून हाताने लिहिलेलं पत्र मिळालं आहे. हे पत्र एका मुलीने तिच्या आईबद्दल लिहिलेलं आहे.
स्तुती नावाच्या या मुलीची आई सोनाली नाहर गोदरेज प्रॉपर्टीजमध्ये काम करते. स्तुती सांगते की ती एकत्र कुटुंबात वाढली आहे. घर, जबाबदाऱ्या, परंपरा सगळं सांभाळून तिची आई नोकरी करते. स्तुतीनं पत्रात लिहिलं की, “मी माझ्या आईला अनेकदा थकलेली पाहिलं आहे, पण कधीच हार मानताना पाहिलं नाही.”
स्तुती म्हणते की तिचे मित्र जेव्हा विचारतात, “तुझी आई कुठे काम करते?” तेव्हा ती अभिमानाने सांगते, “माझी आई गोदरेज प्रॉपर्टीमध्ये काम करते. ही खूप चांगली कंपनी आहे.” ती म्हणते, तिच्या आईला फक्त कामासाठी नाही, तर एक व्यक्ती म्हणून खूप आदर आणि सन्मान मिळतो. त्यामुळे तिला सुरक्षित वाटतं.
हे पत्र वाचल्यानंतर मेघा गोयल यांनी म्हटलं की, “हे पत्र माझ्यासाठी खूप खास आहे. एका मुलीच्या नजरेतून तिच्या आईचं काम दिसणं, हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं समाधान आहे.” त्यांनी सांगितलं की, अशा पत्रांमुळेच काम करण्याची प्रेरणा मिळते.
स्तुतीने आपल्या पत्रात एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. ती म्हणते, “जेव्हा कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना समजून घेते, तेव्हा तिथे काम करणारा कर्मचारी फक्त कर्मचारी राहत नाही, तर तिथे कुटुंबं तयार होतं”
15 वर्षांच्या मुलीचं हे पत्र आज अनेकांना विचार करायला लावणारं आहे. आईचं काम, तिची मेहनत आणि कंपनीचं वर्क कल्चर, हे सगळं मुलीच्या पत्रातून समोर आलं आहे. त्यामुळे कंपनी कशी असली पाहिजे, याचं उत्तम उदाहरण या मुलीचं पत्र आहे.